एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:06+5:302021-03-13T04:35:06+5:30
एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा ...

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे चक्काजाम आंदोलन
एमपीएससीची परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी, रद्द करू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दहावी, बारावी, विद्यापीठ व अन्य परीक्षा घेतल्या जात आहेत. लोकसेवा आयोगाची परीक्षा का रद्द केली जात आहे. यापुर्वी पाच ते सहा वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातून सुमारे १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहेत. अनेकांची तयारी पुर्ण झाली आहे. मात्र, अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. रेल्वे, एनटीपीसी, युपीएससी, बँकीग, आरोग्य सेवा तसेच मागील वर्षातील नीट, जेईई या सर्व परीक्षा झाल्या आहेत. परंतू, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील परीक्षा झालेली नाही. तसेच २०२१ मधील वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सत्तेत येण्यापुर्वी देण्यात आलेले आश्वासन सरकार का पाळत नाही, असा सवालही विद्यार्थ्यांनी केला. आंदोलनात भागवत फड, परशुराम जोगदंड, सोमनाथ वाघमाेडे, अमोल कदम, माधव पवार, विकास ढाकणे, शिवराज जोगदंड, प्रशांत डोंगरे, शंकर जाधव, विठ्ठल चव्हाण, तुकाराम वाघ, विजय गायकवाड, तुळशीदास पौळ, सतिश सकनुरे, आबासाहेब पौळ, सुमित पाटील, गजानन सरकाळे, ज्ञानेश्वर करदाळे, आदींसह हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
अडीच हजार जागा रिक्त...
वेगवेगळ्या पदाच्या अडीच हजार जागा रिक्त आहेत. त्याची जाहीरात काढली जात नाही. कोणतेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. आता तर राज्यसेवेची पुर्व परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे. परीक्षा तात्काळ घेणे आवश्यक आहे. - शंकर जाधव
सहावेळा पुढे ढकलली परीक्षा...
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि शासनाने सहावेळा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. विद्यापीठांच्या तसेच अन्य संस्थाच्या परीक्षा होत असताना एमपीएससीच्या परीक्षेलाच का निर्बंध घातले जात आहेत. शासनाने तात्काळ परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा - भागवत फड
जिल्ह्यातून कमीत कमी १० हजार विद्यार्थी तयारी करीत आहे. कोरोना संसर्गाच्या नावाखाली त्यांचे भविष्य शासन का अंधारात ठेवत आहे. मी परीक्षेची पुर्ण तयारी केली आहे. परंतू आता सध्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अडचण झाली आहे. - विजय गायकवाड
परीक्षेची तयारी पुर्ण झाली होती. १४ मार्चला परीक्षा होती. हॉलतिकीट आले आहे. मी दोन वर्षांपासून तयारी करतोय. दोनशे जागांसाठी २ लाख ७८ हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. आणि सरकार परीक्षा पुढे ढकलत आहे. सरकारचा हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. - शिवराज जाेगदंड
ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षेत येत आहेत. त्यात त्यांना यशही येत आहे. आमचे आई-वडील व्याजाने पैसे काढून मुलांना शिकवितात. मात्र, सरकार स्पर्धा परीक्षांबाबत गंभीर नाही. कोरोनाचे कारण सांगुन ग्रामीण मुलांवर अन्याय करीत आहे. - सोमनाथ वाघमोडे