सीईओंची दोन शाळांना भेटी, ६ शिक्षक आढळले गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:19+5:302021-03-20T04:18:19+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी जढाळा येथे जात होते. ते लातूरहून निघाल्यानंतर ...

सीईओंची दोन शाळांना भेटी, ६ शिक्षक आढळले गैरहजर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल हे एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी सकाळी जढाळा येथे जात होते. ते लातूरहून निघाल्यानंतर तालुक्यातील घारोळा येथील जिल्हा परिषद शाळेत पोहोचले. तिथे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून सीईओ गोयल यांनी विद्यार्थी संख्या पाहिली. शिक्षकांशी सुसंवाद साधला. मुख्याध्यापक माधवराव आयनुले यांच्याकडून माहिती घेतली. शाळेत ९ शिक्षक असताना तीन शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा त्यांनी अनुपस्थित असलेल्या तिन्ही शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर सीईओ गोयल हे थेट वडवळ (नागनाथ) येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत पोहोचले. शाळेत १२ शिक्षक आहेत. ही शाळा इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतची असून विद्यार्थिनी संख्या ४२ असतानाही केवळ १८ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. गोयल यांनी मुख्याध्यापक रामकिशन माळी यांच्याशी चर्चा करून गैरहजर शिक्षकांविषयी माहिती घेतली. सलग तीन दिवसांपासून तीन शिक्षक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी आकाश गोकनवार दिले आहेत.
चौकट....
घारोळा येथील जिल्हा परिषद शाळा आणि वडवळ (नागनाथ) येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथील एकूण सहा शिक्षक शुक्रवारी गैरहजर होते. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी आकाश गोकनवार यांनी सांगितले.