सर्पदंश उपचार केंद्राअभावी जळकोटातील रुग्णांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:03+5:302020-12-07T04:14:03+5:30
जळकोट तालुका हा डोंगरी माळरानाचा आहे. तालुक्याची लोकसंख्या ८४ हजार असून, ४७ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती ...

सर्पदंश उपचार केंद्राअभावी जळकोटातील रुग्णांची हेळसांड
जळकोट तालुका हा डोंगरी माळरानाचा आहे. तालुक्याची लोकसंख्या ८४ हजार असून, ४७ गावांचा समावेश आहे. तालुक्यातील प्रमुख व्यवसाय शेती असून, त्यापाठोपाठ पशुपालन आणि ऊस तोडणी असा आहे. शेती कामे करताना अनेकदा सर्पदंश होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, येथे उपचार केंद्र नसल्याने रुग्णांना ४० किमी दूर असलेल्या मुखेड, उदगीर अथवा लातूरला न्यावे लागते. प्रवासादरम्यान गंभीर रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध केल्यास वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
जळकोट येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील ४७ गावांतील सरपंच, चेअरमन, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आरोेग्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लवकर केंद्र उभारावे...
जळकोट येथील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश उपचार केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सरपंच दाऊद बिरादार, बालाजी आगलावे, शिरीष चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, खादरभाई लाटवाले, सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेताब बेग, उपसरपंच सत्यवान पांडे, दिलीप कांबळे, सत्यवान दळवी, माजी जि.प. सदस्य उस्मान मोमीन, नगरसेवक शिवानंद देशमुख, महेश शेट्टे, धनराज पाटील, हनुमंत नागलगावे यांनी केली आहे.