लातूर : शहरातील श्रीनगर परिसरात असलेले घर चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी घडली. यावेळी सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले की, फिर्यादी लक्ष्मीबाई धाेंडीराम मुठ्ठे (वय ६०, रा. श्रीनगर, लातूर) या आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या हाेत्या. यावेळी बंद असलेल्या घराच्या गेटचे कुलूप ताेडून चाेरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाट फाेडून त्यातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकले. शिवाय कपाटाच्या लाॅकरचे लाॅक ताेडून आत ठेवलेली वीस वर्षांपूर्वीची वापरात असलेली एक बाेरमाळ, राेख १ लाख ६० हजार रुपये असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी बाहेरगावाहून आल्यानंतर मुठ्ठे यांना आपल्या घराच्या गेटचे कुलूप ताेडण्यात आल्याचे दिसले. दरम्यान, घरातील कपाटही फाेडले असून, त्यातील साहित्य अस्ताव्यस्त टाकल्याचे आढळले. कपाटातील लाॅकर ताेडून राेख रक्कम व साेन्याचे दागिनेही लंपास केल्याचे दिसले. शिवाजीनगर पाेलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात मुठ्ठे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञातांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक माराेती मेतलवाड करत आहेत.