एका ग्रामसेवकावर तीन-चार गावांचा भार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:21 IST2021-09-11T04:21:29+5:302021-09-11T04:21:29+5:30

अहमदपूर : तालुक्यातील गावांच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे. परिणामी, प्रत्येक ग्रामसेवकावर तीन-चार गावांच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. ...

The burden of three or four villages on a Gram Sevak! | एका ग्रामसेवकावर तीन-चार गावांचा भार !

एका ग्रामसेवकावर तीन-चार गावांचा भार !

अहमदपूर : तालुक्यातील गावांच्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या अपुरी आहे. परिणामी, प्रत्येक ग्रामसेवकावर तीन-चार गावांच्या कारभाराची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी, ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण वाढला असून गावातील विकास कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

अहमदपूर तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची ६३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या ५१ ग्रामसेवक, ८ ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. तालुक्यात नियुक्तीस असलेले एक ग्रामसेवक अनुपस्थित आहेत. त्यामुळे ९७ ग्रामपंचायतींसाठी ५१ ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी असल्याने एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतींचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. परिणामी, प्रशासकीय कामकाज करताना ग्रामसेवकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

प्रशासकीय कामकाजाचा ताळमेळ घालताना ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही ग्रामसेवकांकडे त्यांच्या मूळ पदभारासह १५ ते २० किमी दूर असलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील विकास कामांवर परिणाम होत असल्याने तक्रारी वाढत आहेत. काही गावांतील नागरिकांकडून ग्रामसेवक गावात येत नसल्याची ओरड ऐकावयास मिळत आहे. सध्या ग्रामसेवकांवर अतिरिक्त ताण पडल्याचे पाहावयास मिळत आहे.

तालुक्यात ९७ ग्रामपंचायती...

तालुक्यात एकूण ९७ ग्रामपंचायती असून त्या तुलनेत ग्रामसेवकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ताण पडत आहे. एक ग्रामपंचायत, एक ग्रामसेवक अशी व्यवस्था निर्माण करावी, म्हणून ग्रामसेवक संघटना राज्य शासनाकडे काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे गावांतील नागरिकांची कामे वेळेत होतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात वेळेत आणि प्रभावीपणे राबविल्या जातील. ग्रामसेवकांना होणारा मानसिक ताणही कमी होईल. शासनाने लवकरात लवकर पद भरती करावी.

- श्याम मुस्के, तालुकाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना.

विकास कामांचा खोळंबा...

सध्या ग्रामसेवकांची संख्या कमी असल्याने दोन-तीन गावांचा त्यांच्यावर कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामे खाेळंबत आहेत. एक गाव, एक ग्रामसेवक ही संकल्पना राबवावी, अशी मागणी रामानंद मुंडे लांजीकर यांनी केली आहे.

Web Title: The burden of three or four villages on a Gram Sevak!