शाळेच्या स्वच्छतेसाठी शिक्षकांवर फवारणीचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:40+5:302021-09-02T04:42:40+5:30
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात बाला उपक्रमाने गती घेतली असून, शालेय परिसर जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी बाला उपक्रमात निवड झालेल्या ...

शाळेच्या स्वच्छतेसाठी शिक्षकांवर फवारणीचा भार
शिरूर अनंतपाळ : तालुक्यात बाला उपक्रमाने गती घेतली असून, शालेय परिसर जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी बाला उपक्रमात निवड झालेल्या शाळांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. शाळेच्या स्वच्छतेसाठी कलागुण जोपासणारे शिक्षक रंगरंगोटीपासून ते फवारणीपर्यंतची कामे स्वखुशीने करीत आहेत. तालुक्यातील उजेड येथील केंद्रीय शाळेच्या एका शिक्षकाने स्वतःच्या खांद्यावर फवारणीचा भार घेऊन शालेय परिसरात वाढलेल्या तणावर नाशकाची फवारणी केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून बाला उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळेतील प्रत्येक वस्तूवर विद्यार्थ्यांची नजर पडली की त्यातून गणित, विज्ञान, इंग्रजी यासह सर्व विषयांचे संबोध लक्षात यावेत, खेळता- खेळता शिक्षणाचे धडे मिळावेत म्हणून शिक्षणाशी निगडित असणाऱ्या प्रमुख ४० निकषांवर अधारित रंगरंगोटी, प्रतिकृती, माॅडेल, रॅम्प, ॲम्पिथिएटर, झोपाळा आदी साधनांची निर्मिती केली जात आहे. गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, विस्तार अधिकारी गोवर्धन चपडे, केंद्रप्रमुख शिवाजी महाराज एरंडे, विठ्ठल वाघमारे यांनी तालुक्यातील ३५ शाळांना भेटी देऊन बाला उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यामुळे तालुक्यातील विविध शाळांमध्ये बाला उपक्रमात अव्वल येण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असून, उजेड येथील मुख्याध्यापक बालाजी जाधव यांनी स्वतः रंगरंगोटी केली, तर बालाजी शिंदे यांनी शाळेच्या स्वच्छतेसाठी स्वतःच्या खांद्यावर फवारणीचा भार घेऊन संपूर्ण परिसरात तणनाशकाची फवारणी सुरू केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू झाली आहे.
दोन शाळा माॅडेल स्कूल बनल्या...
तालुक्यातील अंकुलगा राणी आणि डिगोळ या दोन शाळा सर्वप्रथम बालाचे निकष पूर्ण करून माॅडेल स्कूल बनल्या आहेत. त्यासाठी विठ्ठल वाघमारे, सोमेश्वर भुजंगा, विद्यासागर कांबळे, सुनील मुळे यांनी परिश्रम घेऊन बाला उपक्रमात तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. या माॅडेल स्कूलला शिक्षणप्रेमी भेट देत आहेत.
शिक्षकांच्या मेहनतीमुळे अव्वल येणार...
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सर्व शिक्षक मेहनती असून प्रसंगी शाळेच्या स्वच्छतेसाठी स्वतःच्या खांद्यावर फवारणीचा भार घेणारे बालाजी शिंदे यांच्यासारखे शिक्षक असल्यामुळे लवकरच बाला उपक्रमात तालुका अव्वल येईल, असे मत गटशिक्षणाधिकारी अनिल पागे, विस्तार अधिकारी गोवर्धन चपडे यांनी व्यक्त केले.