अहमदपुरातील ट्रामा केअर सेंटरची इमारत ५ वर्षांपासून धुळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:18 IST2021-04-13T04:18:22+5:302021-04-13T04:18:22+5:30
अहमदपूर : शहरासह तालुक्यातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ट्रामा केअर सेंटरची इमारत उभारण्यात ...

अहमदपुरातील ट्रामा केअर सेंटरची इमारत ५ वर्षांपासून धुळखात
अहमदपूर : शहरासह तालुक्यातील रुग्णांना वेळेवर आरोग्य सेवा मिळावी म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ट्रामा केअर सेंटरची इमारत उभारण्यात आली. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन पाच वर्षे उलटली. परंतु, काही सुविधा अद्याप उपलब्ध करण्यात आल्या नसल्याने ही इमारत धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे.
अहमदपूर शहर हे लातूर - नांदेड महामार्गावर असून, या मार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना व तालुक्यातील रुग्णांना वेळेवर आरोग्यसेवा मिळावी म्हणून येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर करण्यात आले. ट्रामा केअर सेंटरची इमारत पाच वर्षांपूर्वी उभारण्यात आली. परंतु, अद्याप या नव्या इमारतीतून आरोग्य सेवा मिळत नाही. ट्रामा केअर सेंटरमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्यामुळे पाच वर्षांपासून अडीच कोटी रुपयांची इमारत धूळखात पडून आहे. परिणामी, अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने हाल होत आहेत.
अहमदपूर हे तालुक्याचे ठिकाण असून, १२३ गावे - खेडे तसेच वाडी- तांडे आहेत. याच शहरातून राष्ट्रीय महामार्ग जातो. परिणामी, तालुक्यासह शहराची लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात शासकीय अद्ययावत रुग्णालय नाही. त्यामुळे गोरगरीब, सर्वसामान्यांना विविध उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. विशेषत: अपघातातील जखमींवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूर, नांदेड, अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागते.
पाच आरोग्य केंद्र; २५ उपकेंद्र
शहर आणि तालुक्यांची लोकसंख्या साडेतीन ते चार लाखांच्या घरात जाते. अहमदपूर तालुक्यातील हडोळती, शिरूर ताजबंद, किनगाव, अंधोरी, सताळा या ठिकाणी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २५ उपकेंद्र आहेत. ग्रामीण भागातील गंभीर आजारी रुग्णांना उपचारासाठी अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. मात्र, तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी येथे पुरेशा सुविधा नाहीत. परिणामी, रुग्णांना रेफर केले जाते. त्यामुळे रुग्णांना प्रवासासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शहरात ३० खाटांचे शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, ग्रामीण रुग्णालयात अपघातातील जखमींवर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध नाही. परिणामी, खेड्या-पाड्यातील रुग्णांची, अपघातातील जखमींची हेळसांड होत आहे.
आधुनिक यंत्रणेचा अभाव...
अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, सोनोग्राफी, डायलिसीस, त्याचबरोबर रात्री- अपरात्री रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे रक्त उपलब्ध करण्यासाठी ब्लड बँकही नाही. ग्रामीण रुग्णालयात दररोज ५०० ते ६००पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी ग्रामीण भागासह शहरातून येतात. मात्र, गंभीर आजाराची तपासणी करण्यासाठी त्याचबरोबर आगीत, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या आधुनिक वैद्यकीय साधनांचा अभाव आहे. येथील ट्रामा केअर सेंटर तातडीने सुरु करावे, अशी मागणी होत आहे.
यंत्र, फर्निचरसाठी पाठपुरावा...
ट्रामा केअर सेंटरच्या दुसऱ्या मजल्याचे काम बाकी आहे. ट्रामा केअर सेंटरमध्ये यंत्र, फर्निचर साहित्य नाही. साहित्य मिळण्यासाठी संबंधिद विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.