खांब तुटल्याने मुख्य मार्गावरील ट्रान्सफॉर्मर बनले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:19+5:302021-05-05T04:32:19+5:30
शिरूर अनंतपाळ : येथील अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या विरुद्ध बाजूच्या मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही खांब तुटल्याने हे ट्रान्सफॉर्मर ...

खांब तुटल्याने मुख्य मार्गावरील ट्रान्सफॉर्मर बनले धोकादायक
शिरूर अनंतपाळ : येथील अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या विरुद्ध बाजूच्या मुख्य रस्त्याशेजारी असलेल्या ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही खांब तुटल्याने हे ट्रान्सफॉर्मर धोकादायक बनले आहेत. त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यात सदरील ट्रान्सफॉर्मर कोसळण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत असून, मोडलेले खांब तात्काळ बदलण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
शहरातील विविध भागांत विद्युत पुरवठा करण्यासाठी येथील मुख्य रस्त्याच्या शेजारी अनंतपाळ नवयुवक वाचनालयाच्या विरुद्ध बाजूस ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे. त्याद्वारे मुख्य विद्युत तारेच्या माध्यमातून सर्वत्र विद्युत पुरवठा केला जातो; परंतु या ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही खांब मोडले आहेत. त्यातच मागील आठ दिवसांपासून दररोज सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचे मोडलेले खांब आणखी झुकले आहेत. परिणामी, खांब केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे विद्युत तारा तुटून मुख्य रस्त्यावरील रहदारीस धोका होण्याची भीती नाकारता येत नाही. ट्रान्सफॉर्मरचे तुटलेले खांब तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
चार दिवसांत दुरुस्ती...
याबाबत येथील महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता दयानंद बिराजदार म्हणाले, सदरील ट्रान्सफॉर्मरच्या तुटलेल्या खांबांची दुरुस्ती चार दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. तोपर्यंत कोणताही धोका होऊ नये म्हणून ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.