खरोसा लेणीतील छताच्या खांबांना तडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:19 IST2021-07-26T04:19:34+5:302021-07-26T04:19:34+5:30
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा येथील प्राचीन लेणी जीर्ण झाल्या आहेत. लेणींच्या छताला आधार असलेल्या काही ...

खरोसा लेणीतील छताच्या खांबांना तडे !
खरोसा : औसा तालुक्यातील खरोसा येथील प्राचीन लेणी जीर्ण झाल्या आहेत. लेणींच्या छताला आधार असलेल्या काही दगडी खांबांना मोठमोठे तडे गेले आहेत. परिणामी, पावसाळ्यात छतात पाणी झिरपत आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने याकडे लक्ष देऊन आवश्यक ती डागडुजी, दुरुस्ती करणे गरजेचे ठरत आहे.
औसा तालुक्यातील खरोसा येथील लेणी इसवी सन ६व्या शतकातील असाव्यात, असे लेणी अभ्यासकांचे मत आहे. सुमारे १५शे वर्षांपूर्वी कोरलेल्या या लेणी रेखीव असून त्या सध्या खूप जीर्ण झाल्या आहेत. खरोसा गावाच्या पूर्वेला पश्चिममुखी लहान-मोठ्या २१ लेणी आहेत. काही लेणींमध्ये महादेव, विष्णू, बुद्ध या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. भिंतीवरही देवदेवतांच्या मूर्ती असून पुराणातील प्रसंगवर्णनानुसार त्या कोरलेल्या आहेत. या प्राचीन आणि रेखीव लेणी पाहण्यासाठी वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल असते.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही शाळांच्या सहली लेणी पाहण्यासाठी येतात. शिवरात्रीच्या काळात महादेव मंदिरात अखंड शिवनाम सप्ताह असतो. श्रावण महिन्यातही भक्तांची दर्शनासाठी महिनाभर खूप गर्दी असते. लेणी परिसरात पावसाळ्यात निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी डोंगरमाथ्यावर सकाळी आणि सायंकाळी पर्यटकांची वर्दळ असते.
पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील विविध लेणींपैकी दोन लेणींच्या छतामध्ये सध्या पावसाळ्यामुळे पाणी मुरत आहे. तसेच छताला आधार असलेल्या काही खांबांना तडे गेले आहेत. लेणींचा दगड ठिसूळ असल्यामुळे त्याची जास्त प्रमाणात झीज होत आहे. खांबांना तडे गेल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांत आणि पर्यटकांत भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. शासनाने या दुर्लक्षित लेणींकडे लक्ष देऊन पुरातन ठेवा जतन करावा, अशी मागणी पर्यटक आणि भाविकांतून होत आहे.
तक्रार पुरातत्त्व विभागाकडे...
लेणीसंदर्भात कोणाचीही तक्रार आल्यास अथवा काही म्हणणे असल्यास ते आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागास कळवितो. पुरातत्त्व विभागाकडून संपूर्ण दखल घेतली जाते. तहसील कार्यालयात यासंदर्भात निर्णय घेण्याचा अथवा सूचना करण्याचा अधिकार नाही, असे औश्याच्या नायब तहसीलदार वृषाली केसकर यांनी सांगितले.