साखर कारखान्यांचा बॉयलर पेटून महिना उलटला, ऊस दर अद्याप जाहीर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:13 IST2020-12-07T04:13:58+5:302020-12-07T04:13:58+5:30
औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरातील आशिव, मातोळा, उजनी, लोहटा, नांदुर्गा, गुबाळ आदी गावांतून तेरणा नदीचे पात्र असल्याने या भागात दरवर्षी ...

साखर कारखान्यांचा बॉयलर पेटून महिना उलटला, ऊस दर अद्याप जाहीर नाही
औसा तालुक्यातील बेलकुंड परिसरातील आशिव, मातोळा, उजनी, लोहटा, नांदुर्गा, गुबाळ आदी गावांतून तेरणा नदीचे पात्र असल्याने या भागात दरवर्षी उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. गेल्या वर्षी परतीचा पाऊस झाल्याने पुन्हा या भागात ऊस लागवड वाढली. त्यामुळे सध्या ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखान्यांना ऊस पाठविण्यासाठी धावपळ करीत आहेत. यंदा अति पाऊस झाल्याने संपूर्ण खरीप हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे उसाच्या दरावर शेतकऱ्यांची मदार आहे. दरम्यान, साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात होऊन महिना उलटला असला तरीही अद्याप दर जाहीर झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
औसा तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद आहेत, एक खाजगी साखर कारखाना सुरु आहे. तालुक्यासह बेलकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असल्याने इतर तालुक्यातील, जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या उस तोडीच्या टोळ्या सध्या बेलकुंड परिसरात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ऊस तोडणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच शेतकरीही ऊस पाठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
उसाचे गाळप झाल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देणे आवश्यक आहे. परंतु, अद्याप दरच जाहीर झाला नसल्याने उसाचे पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नाहीत.
तालुक्यातील दोन्ही कारखाने बंद...
औसा तालुक्यात दोन सहकारी साखर कारखाने आहेत. परंतु, ते यंदाही बंद आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील अथवा परजिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवावा लागत आहे. सध्या जिल्ह्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना, रेणापूर तालुक्यातील रेणा सहकारी, निवळीचा विलास कारखाना, उदगीर तालुक्यातील तोंडार येथील विलास- २, तळेगाव भो. येथील जागृती शुगर, उजना येथील सिध्दी शुगर आणि औसा तालुक्यातील साईबाबा शुगर हे कारखाने सुरु आहेत.