रस्त्यांच्या कामासाठी भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:41+5:302021-07-28T04:20:41+5:30
लातूर : शहरातील रिंगरोड अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीला अडचण होत आहे. महापालिका ...

रस्त्यांच्या कामासाठी भाजपचे आंदोलन
लातूर : शहरातील रिंगरोड अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीला अडचण होत आहे. महापालिका व राज्य सरकार या रस्त्याच्या कामासाठी लक्ष घालत नाही. त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य शासन व मनपा पदाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. नांदेड नाका, रेणापूर चौक या रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यामुळे छोटेमोठे अपघात होत आहेत. नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन जागे करण्याचा प्रयत्न केला; परंतु अद्याप महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांदेड रोड, रिंगरोड येथे आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, मनीष बंडेवार, ॲड. शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पालकमंत्र्यांनी रस्त्याच्या कामासाठी लक्ष घालावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जिल्हा नियोजन व विकास समितीकडून निधीची तरतूद करण्यात आली. रस्त्यासाठी टेंडरही काढण्यात आले. मात्र रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. याला कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित करीत भाजप कार्यकर्त्यांनी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत भाजप आंदोलन करीत राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.