भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:11+5:302021-03-09T04:22:11+5:30
गोविंद निवृत्ती भदाडे (३८, रा. लातूर रोड, ता. चाकूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोविंद भदाडे ...

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
गोविंद निवृत्ती भदाडे (३८, रा. लातूर रोड, ता. चाकूर) असे अपघातात जागीच ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोविंद भदाडे हे सोमवारी सकाळी लातूरहून चाकूरकडे दुचाकी (एमएच १४, जेके १२४७) वरून येत होते. दरम्यान, नांदेडहून लातूरकडे कार (एमएच २६, बीक्यू ९९९९) ही जात होती. नांदगाव पाटीनजीक कार व दुचाकीची समोरासमोर जोरात धडक बसली. त्यात गोविंद भदाडे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा चक्काचूर झाला तर कारच्या समोरील भागाचेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक हरिदास उळागड्डे, पो.हे.कॉ. दत्तात्रय गिरी, नितीन चव्हाण, राहुल गव्हाणे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, चाकूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, स.पो.नि. संदीप कामत, पो.हे.कॉ. भागवत मामडगे, सुशांत दिवटे हेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी गोविंद भदाडे यांचा मृतदेह नळेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठिवला. भदाडे हा पुणे येथे काम करीत होता. तो पुण्याहून दुचाकीवर गावाकडे येत होता, असे सांगण्यात आले. त्याच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.