सावधान, १६४ गावांमध्ये पिण्याचे पाणी ठरू शकते आजाराचे कारण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:13 IST2021-07-12T04:13:45+5:302021-07-12T04:13:45+5:30
लातूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने मे-जून महिन्यांत पाणी नमुने तपासण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत ...

सावधान, १६४ गावांमध्ये पिण्याचे पाणी ठरू शकते आजाराचे कारण !
लातूर : पावसाळ्यात जलजन्य आजार होऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने मे-जून महिन्यांत पाणी नमुने तपासण्याची मोहीम राबविली. या मोहिमेत १६९९ नमुने तपासण्यात आले असून, त्यात २९४ नमुने दूषित आढळले आहेत. १६४ गावांमध्ये दूषित नमुने आढळले असून, ही गावे जोखीमग्रस्त म्हणून आरोग्य विभागाने नोंदविली आहेत. या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणी नमुने दूषित आढळलेल्या गावांतील जलस्रोत शुद्धिकरण करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. क्लोरीनेशन आणि क्लोरीनवॉश ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य उपकेंद्रांतर्गत, तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी साथरोग औषधी किट ठेवण्याच्या योजनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत. शिवाय, जोखीमग्रस्त नदीकाठच्या गावांत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षणाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुढील पंधरा दिवस क्लोरिनेशन आणि क्लोरीनवॉक विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी दिली.
प्रत्येक गावांतील पाणी नमुन्यांची तपासणी
प्रत्येक गावातील पाणी नमुन्यांची तपासणी मे-जून महिन्यांत करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यात १६७ नमुने तपासण्यात आले. त्यात ४२ नमुने दूषित आढळले.
औसा तालुक्यात १७६ नमुने तपासण्यात आले असून, १३ पाणी नमुन्यात दोष आढळले आहेत. ७.३९ टक्के पाणी नमुने या तालुक्यात दूषित आहेत.
चाकूर तालुक्यामध्ये २६८ नमुने तपासण्यात आले असून, ६६ नमुने दूषित आढळले असून, दूषित पाणी नमुन्यांची टक्केवारी २४.६३ टक्के आहे.
कोरोनामुळे नमुने घटले
लातूर जिल्ह्यात एकूण १६९९ नमुन्यांपैकी २९४ नमुने दूषित आहेत. त्याची टक्केवारी १७.३० टक्के आहे. दूषित आढळलेल्या पाणी नमुन्यांच्या स्रोतांचे शुद्धिकरण केले जात आहे.
देवणी १२, जळकोट ९, लातूर २१, निलंगा ५२, रेणापूर ७, शिरूर अनंतपाळ २४ आणि उदगीर तालुक्यात ४८ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.
दूषित पाणी नमुने आढळलेल्या ग्रामपंचायतींना सतर्कतेबाबत आवाहन करण्यात आले असून, पाणी शुद्धिकरणासाठी नियमित क्लोरिनवॉश करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
पावसाळ्यात जलजन्य आजार उद्भवतात. उलटी, जुलाब असे आजार होतात. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.
आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्यावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यातील दूषितपणा नाहीसा होतो.
खाद्यपदार्थ उघडे ठेवू नयेत. माशा बसून आजार होऊ शकतात. शिवाय, शिळे अन्नही खाऊ नये. ताजे गरम अन्न खावे.
जीएसबीए लॅबमध्ये १६७५ नमुने तपासण्यात आले. त्यात २८६ नमुने दूषित आढळले, तर जिल्हा लॅबमध्ये १६९९ पैकी १९४ नमुने दूषित आढळले आहेत.