सदृढ आरोग्यासाठी साडेपाच हजार गरोदर मातांना २ कोटींचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:23+5:302021-09-12T04:24:23+5:30

अहमदपूर : गरोदर माता व बालकांचे आरोग्य सुधारावे, म्हणून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत सकस आहारासाठी प्रोत्साहित आर्थिक मदत दिली जाते. ...

Benefit of Rs. 2 crore for five and a half thousand pregnant mothers for good health | सदृढ आरोग्यासाठी साडेपाच हजार गरोदर मातांना २ कोटींचा लाभ

सदृढ आरोग्यासाठी साडेपाच हजार गरोदर मातांना २ कोटींचा लाभ

अहमदपूर : गरोदर माता व बालकांचे आरोग्य सुधारावे, म्हणून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत सकस आहारासाठी प्रोत्साहित आर्थिक मदत दिली जाते. या योजनेंतर्गत चार वर्षे ८ महिन्यांत तालुक्यातील ५ हजार ५४१ गरोदर महिलांना २ कोटी १७ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री मातृवंदना योजना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे. गरोदर मातांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व नवजात शिशू सुदृढ असावे, तसेच माता व बाल मृत्युदरात घट व्हावी, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरी व ग्रामीण भागात योजना राबविली जाते. नोकरदार महिला वगळता अन्य मातांना या योजनेचा लाभ घेता येतो.

गरोदरपणाच्या काळात माता कुपोषित राहू नये, म्हणून राज्यात २०१७ पासून ही योजना सुरू करण्यात आली. केंद्राकडून ६० टक्के तर राज्याकडून ४० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात येतो. योजनेंतर्गत गर्भवती महिलेस तीन टप्प्यांत पाच हजार रुपये देण्यात येतात.

योजनेसाठीच्या आवश्यक बाबी...

लाभार्थी महिला व तिच्या पतीचे आधार कार्ड, तसेच लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे. गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत १०० दिवसांच्या आत नोंदणी करावी. बाळाच्या जन्म नोंदणीचा दाखला व प्राथमिक लसीकरण महत्त्वाचे आहे.

ग्रामीण भागात ४ हजार ६३९ मातांना लाभ...

या योजनेचा शहरातील ९०२ गरोदर मातांना लाभ मिळाला असून, २८ लाख ९३ हजार रुपयांचे वाटप केले आहे. ग्रामीण भागात ४ हजार ६३९ गरोदर मातांना लाभ मिळाला आहे. १ कोटी ८८ लाख ४९ हजारांचे वाटप केले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

सातत्याने जनजागृती सुरू...

या योजनेचा अधिकाधिक गरोदर मातांना लाभ देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी बॅनर, पोस्टर लावण्यात येणार आहे. या योजनेचा आर्थिक लाभ मिळावा, म्हणून जास्तीतजास्त गर्भवती मातांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: Benefit of Rs. 2 crore for five and a half thousand pregnant mothers for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.