शिरूर अनंतपाळ : घरणी प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील उसासह रबी पिकांसाठी आजपर्यंत दोन आवर्तन पूर्ण आले आहेत. मंगळवारपासून तिसरे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे घरणीच्या कालवा सिंचनाचा ६०० हेक्टर्सवरील उसाला लाभ झाला असून, तिसऱ्या आवर्तनात दोन्ही कालव्याद्वारे १.५० दलघमी पाण्याचा विसर्ग होत आहे.
गत पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने घरणी मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला होता. त्यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून येथील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी उन्हाळी हंगामातील पिकांना कालवा सिंचनद्वारे लाभ देण्यासाठी सिंचन वेळापत्रकाचा कृती आराखडा तयार केला. त्यानुसार प्रकल्पातील ७.८२० दलघमी उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी कालवा सिंचनाचे तीन आवर्तन निश्चित केले. त्यासाठी राजेंद्र पांचाळ, संतोष म्हैसेवाड, एस. पी. केजकर, गोविंदराव मोरे यांच्या नेतृत्वात सिंचन पथक स्थापन करण्यात आले. आजपर्यंत दोन आवर्तन पूर्ण झाले आहेत. मंगळवारपासून तिसरे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कालवा सिंचनचा तालुक्यातील ६०० हेक्टर्समधील पिकांना लाभ झाला आहे.
जल साठ्यावर ४५० हेक्टर्स ऊस...
घरणी मध्यम प्रकल्पात जलसाठा मोठा आहे. गेल्या वर्षी घरणी प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यामुळे साठ्यातील पाण्याचा लाभ घेऊन विविध गावांतील शेतकऱ्यांनी ४५० हेक्टर्सवर उसाची लागवड केली. प्रकल्पाच्या दोन्ही कालवा सिंचनाद्वारे १५० हेक्टर्सवर उसाची लागवड झाली. एकूण ६०० हेक्टर्सला कालवा सिंचनाचा लाभ झाला आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा...
घरणी प्रकल्पात आता केवळ ५.१९७ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तरीही पाटबंधारे विभागाने तिसरे आवर्तन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थकित पाणीपट्टी भरून तिसऱ्या आवर्तनातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी केले आहे.