बीबीएफ तंत्रज्ञानामुळे अतिवृष्टीतही नुकसान झाले कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:03+5:302021-07-29T04:21:03+5:30

निलंगा : बीबीएफ यंत्राच्या सहायाने खरिपाची पेरणी केल्यामुळे वेळ, मजुरी, पैशाची बचत झाली आहे. याशिवाय, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसानही कमी ...

BBF technology also reduced damage in heavy rains | बीबीएफ तंत्रज्ञानामुळे अतिवृष्टीतही नुकसान झाले कमी

बीबीएफ तंत्रज्ञानामुळे अतिवृष्टीतही नुकसान झाले कमी

निलंगा : बीबीएफ यंत्राच्या सहायाने खरिपाची पेरणी केल्यामुळे वेळ, मजुरी, पैशाची बचत झाली आहे. याशिवाय, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसानही कमी झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यंदा निलंगा तालुक्यात उशिरा पाऊस झाला. दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम आणि तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी रणजित राठोड यांनी निलंगा मंडळातील प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. कृषी सहायक सुनील घारुळे यांनी बीबीएफ संकल्पना समजावून सांगितली. या उपकरणामुळे वेळ, पैशांची बचत होते. शिवाय, पेरणी करताना एकाच वेळी बियाणे आणि खते त्यातून टाकता येतात. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना या तंत्राचा चांगला फायदा झाला आहे. बीबीएफवर सोयाबीन पेरणी केलेल्या एकाही शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले नाही. कारण, पाण्याचा निचरा झाला. या तंत्रज्ञानामुळे सरीत पडलेले पावसाचे पाणी चांगले मुरते. अधिक पाऊस झाल्यास सरीद्वारे पाण्याचा निचरा होतो. पावसाचा खंड पडल्यास पिके पाण्याचा ताण सहन करतात.

निलंगा मंडळात ३५०० हेक्टरवर बीबीएफवर पेरणी झाली. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांनी बीबीएफवर सोयाबीन पेरणी केली होती, त्यांच्या सोयाबीनच्या प्लॉटचे सर्वेक्षण केले असता एकाही शेतकऱ्याचे सोयाबीन पिवळे पडले नाही अथवा पाणी लागून वाढ खुंटलेली नाही.

बियाणे, खताचीही बचत...

मी माझ्या शेतात १० हेक्टरवर प्रथमच बीबीएफ तंत्रज्ञानावर अधारित सोयाबीनची पेरणी केली. एकरी १५ किलो बियाणे लागले. त्यामुळे बियाणे व खताची बचत झाली. महत्त्वाचे म्हणजे, अतिवृष्टीत माझ्या सोयाबीन प्लॉटमध्ये पाणी साचले नसल्याने नुकसान झाले नाही.

- गोविंद शिंगाडे, शेतकरी, निलंगा.

३५०० हेक्टरवर पेरा...

निलंगा मंडळात बीबीएफवर ३५०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यात सर्व कृषी सहायकांनी चांगले काम केले. आत्मांतर्गत कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले.

- रणजित राठोड, मंडळ कृषी अधिकारी.

Web Title: BBF technology also reduced damage in heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.