कोरोनाचा लढा एकदिलाने एकजुटीने लढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:20 IST2021-05-07T04:20:31+5:302021-05-07T04:20:31+5:30
कोरोनामुक्त झाल्यानंतर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हावासियांशी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना काळात हा लढा लढण्यासाठी कोरोना ...

कोरोनाचा लढा एकदिलाने एकजुटीने लढावा
कोरोनामुक्त झाल्यानंतर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हावासियांशी ऑनलाईन संवाद साधला. ते म्हणाले, कोरोना काळात हा लढा लढण्यासाठी कोरोना योद्धे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या लाटेला थोपविण्यासाठी जिल्हावासियांनी सर्व मतभेद बाजुला ठेवून एकदिलाने व एकजुटीने एकत्रित येऊन लढणे काळाची गरज आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमावावा लागला असून, अनेकांना बाधा झाली. ज्या परिवारातील लोकांचे जीव गेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या परिवाराची काळजी घेण्यासाठी आपण पुढे येऊ असा शब्दही आ. निलंगेकर यांनी यावेळी दिला. कोरोनावर मात करणे सहज शक्य आहे. मात्र यासाठी काळजी घेणे आणि भीती बाजूला ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्यावर कोरोनाचे उपचार चालू आहे ते सर्वजण सुखरुप घरी यावेत याकरीता सर्वांनीच ईश्वराकडे प्रार्थना करावी. ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे असतील त्यांनी दुखणे अंगावर न काढता तात्काळ उपचार घ्यावेत. गावा-गावातील युवकांनी एकत्र येत जनजागृती करावी. कोरोना काळात भीती हा मोठा व्हायरस असून यावर हिंमत हेच व्हॅक्सीन आहे. या संकटाला हिमतीने सामोरे जाण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. कोरोनाला दुर ठेण्यासाठी लसीकरण हे मोठे शस्त्र असून याकरीता सुद्धा गावा-गावातील युवकांनी व नागरिकांनी जनजागृती करत आपल्या गावात शंभर टक्के लसीकरण कसे होईल याकरीता पुढाकार घ्यावा. या संकट काळात राजकारण बाजुला ठेवत आवश्यक असणारी मदत व आरोग्य उपकरणे, कोरोनाच्या उपचारासाठी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सामुहिक प्रयत्न आवश्यक असून या करीता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार करीत असल्याचेही आ. निलंगेकर म्हणाले.
कोरोनामुक्ती नंतरचे जीवन जनसेवेसाठी...
कोरोनाच्या आजारातून बाहेर पडलो असलो तरी याकरिता जिल्ह्यातील अनेकांच्या प्रार्थना व शुभेच्छा माझ्या पाठीशी होत्या. या प्रेमामुळेच आपण कोरोनामुक्त झाल्याचे आ. निलंगेकर म्हणाले. या अगोदरही जनसेवेसाठी आपणच बांधीलच होतो आता मात्र कोरोनामुक्त झाल्यानंतर आयुष्याची दुसरी इनिंग जनसेवेसाठी समर्पित करीत असल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले.