हातातला बॅट-बॉल गेला... पायी आले पैंडल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:18 IST2021-03-28T04:18:42+5:302021-03-28T04:18:42+5:30
लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरासह जिल्ह्यातील विविध क्रीडांगणे प्रशासनाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे खेळाडूंची पंचाईत झाली आहे. आपला ...

हातातला बॅट-बॉल गेला... पायी आले पैंडल
लातूर - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरासह जिल्ह्यातील विविध क्रीडांगणे प्रशासनाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे खेळाडूंची पंचाईत झाली आहे. आपला शारीरिक फिटनेस कायम रहावा, यासाठी खेळाडू धडपडत आहेत. त्यातच शहरातील माजी क्रिकेटपटूंनी दैनंदिन सरावर बंद झाल्याने सायकलिंगचा फंडा अवलंबून आपली शारीरिक तंदुरूस्तीची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हातातील बॅटबॉल गेला अन् पायी आले पैंडल असे म्हणण्याची वेळ आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या क्रिकेट मैदानावर सकाळ, सायंकाळच्या सत्रात अनेक आजी-माजी खेळाडू सराव करतात. प्रशासनाने दोन दिवसांपासून खेळांची मैदाने बंद केल्याने त्यांचा सराव बंद होता. त्यातच माजी खेळाडूंनी शक्कल लढवून सर्वांना एकत्र करत दैनंदिन फिटनेससाठी सायकलिंग करण्याचे ध्येय हाती घेतले आहे. शनिवारपासून याला सुरूवात झाली असून, पहिल्या दिवशी जवळपास २० किलोमीटर सायकलिंग या माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. यात प्रा. महेश बेंबडे, विजय खानापुरे, सिकंदर पटेल, श्रीनिवास इंगोले, अनिल कुरूंदकर, अशाेक वाघमारे यांच्यासह माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. दैनंदिन सराव करणा-या खेळाडूंना मैदानावर गेल्याशिवाय करमत नाही. न खेळल्याने त्यांचा दिवसही कंटाळवाना जातो. त्यामुळे सकाळच्या सत्रात ते नेहमीच दैनंदिन सरावाचा प्रयत्न करतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मैदाने बंद असल्याने त्यांच्या या नित्य नियमाला फाटा बसला आहे. एकंदरित रोज हातात क्रिकेटची बॅट किंवा बॉल घेणारे या माजी क्रिकेटपटूंच्या पायात मात्र फिटनेससाठी पैंडल दिसले.
फिटनेस कायम राखण्यासाठी प्रयत्न
मैदाने बंद झाल्याने क्रिकेटचा सराव बंद झाला आहे. शरीराची तंदुरूस्ती कायम राखण्यासाठी शारीरिक कसरती करणे गरजेचे आहे. त्यामुळे सायकलिंगचा पर्याय आम्ही निवडला आहे. पहिला दिवस असल्याने थोडा त्रास झाला. मात्र सायकलिंगची मजा लुटत व्यायामही झाला. रविवारी औसा येथे जावून येण्याचा मानस असून, मैदान चालू होईपर्यंत सायकलिंगचा आधार घेत फिटनेसची लय कायम राखणार असल्याचे या क्रिकेटपटूंनी सांगितले.