चाकुरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी स्थानकातील पडक्या ओट्याचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:27+5:302021-05-20T04:20:27+5:30
संदीप अंकलकोटे चाकूर : शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी अद्यापही नगरपंचायतीने कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. परिणामी ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी ...

चाकुरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी स्थानकातील पडक्या ओट्याचा आधार!
संदीप अंकलकोटे
चाकूर : शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी अद्यापही नगरपंचायतीने कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. परिणामी ज्येष्ठांना विरंगुळ्यासाठी बसस्थानकातील पडक्या ओट्याचा आधार घ्यावा लागत आहे. दररोज बसस्थानकातील प्रदूषणयुक्त दुर्गंधीत जीव धोक्यात घालून बसावे लागत आहे.
राज्य शासनाने सन २०१८ मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाविषयी आदेश काढला असून, ज्येष्ठांच्या विरंगुळा केंद्राला जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाला केल्या आहेत. शहरात सुमारे ४५० हून अधिक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यात शिक्षक, प्राध्यापक अन्य विभागांतील ज्येष्ठ नागरिक आहेत. शहरात त्यांना मोकाळा श्वास घेण्यासाठी खुले मैदान नाही. बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. ज्येष्ठ नागरिक भवन नाही. त्यामुळे काही ज्येष्ठ नागरिक घरी बसण्यास पसंती देतात. काही ज्येष्ठ मंडळी नाइलाजाने बसस्थानकातील पडक्या ओट्याचा आधार घेऊन तिथे गप्पा मारून आपला विरंगुळा करतात. या बसस्थानकाच्या आवारात गर्दी असते. शिवाय, येथे घाणीचे साम्राज्य, प्रदूषणयुक्त दुर्गंधी आहे. मात्र, नाइलाजास्तव ज्येष्ठ नागरिक अशाही परिस्थितीत तिथेच विरंगुळा करतात.
चाकूर नगरपंचायत अस्तित्वात येऊन ५ वर्षे झाली. मात्र, ज्येष्ठांच्या प्रश्नाकडे अजून लक्ष वेधले नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात अनेक ठिकाणी ग्रीन बेल्ट आहेत. त्यापैकी मध्यवर्ती ठिकाणच्या एखाद्या ग्रीन बेल्टच्या खुल्या जागेवर ज्येष्ठ नागरिक भवन उभारण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून नगरपंचायतीकडे होत आहे.
निधी उपलब्ध करून देऊ...
चाकूर शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र नाही. शहरात अनेक ठिकाणी ग्रीन बेल्ट आहेत. तिथे ज्येष्ठ नागरिक भवन झाले पाहिजे. त्यासाठीचा प्रस्ताव नगरपंचायतीने अद्याप तयार का केला नाही, याची खंत वाटते. नगरपंचायतीकडे ग्रीन बेल्ट आहे. त्यांनी त्याचा वापर विरंगुळा केंद्रासाठी करावा. त्यावर सोयी-सुविधा निर्माण करून द्याव्यात. जर निधी नसेल तर त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ.
- आमदार बाबासाहेब पाटील.
तीन वर्षांपासून खेटे सुरू...
चाकुरातील ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असावे. शासनाच्या धोरणानुसार नगरपंचायतीने विनामूल्य जागा उपलब्ध करून द्यायला हवी. नगरपंचायतीकडे ३ वर्षांपासून खेटे मारत आहे. तिथे आमच्या प्रश्नाचा विचार केला जात नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाइलाजाने बसस्थानकातील पडक्या ओट्याचा आधार घ्यावा लागतो आहे.
- शिवाजीराव नवरखेले, माजी प्राचार्य.
लवकरच विरंगुळा केंद्र...
चाकूर शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अथवा भवन नाही. शहरातील ग्रीन बेल्ट अथवा अन्य खुल्या जागांची पाहणी लवकरच करण्यात येईल. तिथे विरंगुळा केंद्र अथवा भवन सुरू करण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येईल.
- अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगर पंचायत.