कवठाळ्यात अवैध दारु विक्रीला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST2021-03-13T04:35:37+5:302021-03-13T04:35:37+5:30
वलांडी : देवणी तालुक्यातील कवठाळा येथे अवैध दारु विक्रीमुळे गावात तंटे होत असल्याचे पाहून महिलांनी त्याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. ...

कवठाळ्यात अवैध दारु विक्रीला बंदी
वलांडी : देवणी तालुक्यातील कवठाळा येथे अवैध दारु विक्रीमुळे गावात तंटे होत असल्याचे पाहून महिलांनी त्याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. गुरुवारच्या ग्रामसभेत महिलांनी दारुविक्री बंद करण्याचा ठराव मांडून तो मंजूर करुन घेतला.
१५ व्या वित्त आयोगांतर्गत वार्षिक आराखडा तयार करण्यासाठी मंगळवारी सरपंच शंकरराव हुडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिलांनी दारुबंदी करावी, अशी मागणी केली. त्यासाठी ग्रामपंचायतीने मदत करावी, आम्ही पुढाकार घेऊन दारुबंदी करतो, असा पवित्रा महिलांनी घेतला होता. गावातील महिलांनी आपला मोर्चा दारु विक्रेत्यांच्या घराकडे वळवला, तेव्हा सरपंचांनी दारु विक्रेत्याला सूचना केल्या. दरम्यान, बुधवारी मद्यप्राशन केल्यानंतर काही युवकांमध्ये भांडण झाले होते. यावेळी एकाच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त करत गुरुवारच्या ग्रामसभेत दारुबंदीचा ठराव मांडला. यापुढे दारु पिणाऱ्या व दारुची विक्री करणाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्याचा निर्धार करण्यात आला. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच शंकरराव हुडे यांनी दिली.
यावेळी महानंदा हुडे, लक्ष्मी हेबाडे, कचरुबाई सूर्यवंशी, अंजली मुळे, संगीता माने, श्रीदेवी हुडे, संगीता बोचरे, कल्पना धानुरे, सायराबी शेख, काशीबाई पाटील, पिरमाबी शेख, अनुसया बरगाले, सुमित्रा कलवले, रेखा पताळे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.