वरुणराजाने उघडीप दिल्याने बळीराजा धास्तावला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:22+5:302021-06-28T04:15:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रेणापूर : मृगाच्या प्रारंभी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे खरिपाच्या आतापर्यंत एकूण ५७.९५ टक्के ...

वरुणराजाने उघडीप दिल्याने बळीराजा धास्तावला !
लोकमत न्यूज नेटवर्क
रेणापूर : मृगाच्या प्रारंभी तालुक्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे खरिपाच्या आतापर्यंत एकूण ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, आठवडाभरापासून पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या. पिके उगवली असून, पावसाची गरज आहे. त्यामुळे बळीराजा वरुणराजाच्या प्रतीक्षेत आहे.
रेणापूर तालुक्यात वरुणराजा मृगाच्या प्रारंभी बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पुढील काळातही पाऊस पडेल, या आशेवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. दरम्यान, हवामान खात्यानेही मान्सून सक्रिय झाला असून, तो सुरु होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला सुरुवात केली.
तालुक्यातील पाच महसूल मंडलांत खरिपासाठी एकूण ४८ हजार ६६० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य आहे. आतापर्यंत तालुक्यात २८ हजार २०० हेक्टरवर म्हणजेच ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वात कमी पेरणी रेणापूर आणि पोहरेगाव महसूल मंडलांत झाली आहे. सर्वाधिक पेरा कारेपूर, पळशी व पानगाव यात तीन मंडलांमध्ये झाला आहे.
खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्या तरी आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे उगवलेल्या पिकांना आता पाण्याची गरज आहे. तसेच आणखीन ४२ टक्के क्षेत्रावर पावसाअभावी पेरण्या राहिल्या आहेत. सध्या पेरणी केलेले आणि पेरणी न केलेले शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. लवकर पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येण्याची भीती आहे.
सोयाबीनचा सर्वाधिक पेरा...
रेणापूर तालुक्यातील पाच महसूल मंडलांत ५७.९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात रेणापूर मंडलात ३ हजार ९२९, पानगाव ६ हजार २६७, पळशी ६ हजार ४५१, कारेपूर मंडलात ७ हजार २९५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून, तो २५ हजार ६६३ हेक्टरवर झाला आहे. त्यापाठोपाठ तुरीचा १ हजार ९९८ हेक्टर, मूग २०९, उडीद ९७, ज्वारी १२५, मका ७० असा पेरा झाला आहे.
आतापर्यंत १९४ मिमी पाऊस...
रेणापूर तालुक्यात आतापर्यंत १९४.१ मिमी पाऊस झाला आहे. मृगाच्या प्रारंभी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. आता पावसाची गरज आहे. दरम्यान, शनिवारी रात्री काही प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे यांनी केले.
पावसाची नितांत गरज...
मृगाच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने यापुढेही पाऊस होईल, या आशेवर पेरणी केली. सध्या पिके उगवली असून, पाण्याची गरज आहे. परंतु, आठवडाभरापासून पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे, असे शेतकरी भागवत माने यांनी सांगितले.