बसपूर-बाकली मांजरा नदीवरील पुलाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:24 IST2021-09-15T04:24:38+5:302021-09-15T04:24:38+5:30
केळगाव : येथील मांजरा नदीवरील बसपूर-बाकलीच्या हद्दीवरील पुलाची दुरवस्था झाली असून, दोन्ही बाजूचे पाईप नसल्यामुळे व पुलावरील सळई उघड्या ...

बसपूर-बाकली मांजरा नदीवरील पुलाची दुरवस्था
केळगाव : येथील मांजरा नदीवरील बसपूर-बाकलीच्या हद्दीवरील पुलाची दुरवस्था झाली असून, दोन्ही बाजूचे पाईप नसल्यामुळे व पुलावरील सळई उघड्या पडल्याने वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे.
निलंगा तालुक्यातील बसपूर, बाकली, राणी अंकुलगा. साकोळ, बिबराळ, घुगी सांगवी या गावांना जोडणाऱ्या मांजरा नदीवरील पूलाची दुरवस्था झाली आहे. हा निलंगा-शिरूर अनंतपाळ तालुक्याचा जवळच्या मार्गाने जोडणारा मार्ग असून, या नदीवरील पूल बांधकाम करून जवळपास पंधरा वर्षे झाली आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत हा रस्ता मंजूर झाला असला तरी अनेक ठेकेदार काम अर्धवट सोडून पळ काढत आहेत. दोन तालुक्याच्या हद्दीवरील हा पूल असल्यामुळे या पुलाच्या दुरूस्तीसाठी निधी मिळत नाही. पुलाच्या पृष्ठभागावरील सळई उघड्या पडल्या असून, दोन्ही बाजूचे पाईप नसल्यामुळे वाहतुकीसाठी मोठी अडचण होत असून, अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सध्या मांजरा नदी मोठ्या प्रमाणात भरून असल्याने लहान बालके शेताकडे जात असताना नदी मध्ये डोकावून पाहत आहे. या पुलावरील रस्त्याच्या बाजूला सुरक्षा पाइप नसल्याने भीती वाढली आहे. तर शेतकऱ्याची जनावरे बैलगाडी याच मार्गावरुन जात असल्याने त्यांची गैरसाेय होत आहे. सळई उघड्या पडल्याने अनेक वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ता दुरूस्तीसाठी विशेष निधी मंजूर करून तत्काळ पूल दुरूस्ती करावी अशी मागणी बसपूर व बाकली गावातील नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी...
मांजरा नदीच्या पलीकडे शिरूर अनंतपाळला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. दुरवस्थेमुळे रात्रीच्या वेळी पुलावरील खड्याचा अंदाज लागत नाही. पुलाच्या बाजूला पाईपही नसल्याने अडचण व धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पूलाची दुरुस्ती करावी. - रमेश लांबोटे, शेतकरी माचरटवाडी