औसा-लातूर महामार्गावर कार अडवून लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:52+5:302020-12-05T04:32:52+5:30
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सिद्धेश्वर दशरथ जाधव हे लातूरहून सोलापूरला कारने निघाले होते. औसा तालुक्यातील बुधोडा गावानजीक त्यांच्या कारला ...

औसा-लातूर महामार्गावर कार अडवून लुटण्याचा प्रयत्न
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सिद्धेश्वर दशरथ जाधव हे लातूरहून सोलापूरला कारने निघाले होते. औसा तालुक्यातील बुधोडा गावानजीक त्यांच्या कारला दोघांनी अडविले. त्यांच्या हातात काठी, दगड होते. परंतू, जाधव यांनी तिथे कार न थांबविता पुढे नेली. मात्र, मागून कारवर या दोघांनी दगडफेक केली. काही अंतरावर कार थांबवून जाधव यांनी या दोघांजवळ येऊन दगडफेक का करता असे विचारले. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. दरम्यान, जाधव यांनी परवाना असलेल्या स्वता:च्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळी झाडली. यावेळी एकजण पळून गेला तर एकाला त्यांनी धरुन ठेवले. तेवढ्यात दरोडा प्रतिबंधक पथक पेट्रोलींग करताना तिथे दाखल झाले. या पथकाने एकाला ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो बुधोडा गावातीलच संगमेश्वर व्यंकट कांबळे असल्याचे समजले. त्याचा दुसरा साथीदार लहू हंसराज गायकवाड हाही बुधोड्याचाच निघाला. त्याला पोलीसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटोदा येथून ताब्यात घेतले. घटनास्थळी औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याबाबत औसा पोलीस ठाण्यात कलम ३९३, ३३६, ३४१, ४३७, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक दिवसाची पोलीस कोठडी...
या प्रकरणात पोलीसांनी संगमेश्वर कांबळे याला औसा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरा लहू गायकवाड याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी सांगितले.