२१ व्या वर्षीच गावच्या कारभाराची धुरा हाती; अतितटीच्या लढतीत संगमेश्वर सोडगीर सरपंचपदी
By हरी मोकाशे | Updated: December 20, 2022 19:27 IST2022-12-20T19:26:58+5:302022-12-20T19:27:31+5:30
बीए तृतीय वर्षातील संगमेश्वर सोडगीर सरपंच झाला आहे

२१ व्या वर्षीच गावच्या कारभाराची धुरा हाती; अतितटीच्या लढतीत संगमेश्वर सोडगीर सरपंचपदी
लातूर : तालुक्यातील शिंदगी (खु.) व मांगदरी ग्रुप ग्रामपंचायतीसाठी भाजपाच्या दोन गटात अतितटीची लढत झाली. गावातील नागरिकांनी नव्या चेहऱ्यांना संधी देत बीए तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षे चार महिने पूर्ण केलेल्या संगमेश्वर सोडगीर याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ घातली आहे. निकाल जाहीर होताच जल्लोष साजरा करण्यात आला.
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी खु. आणि मांगदरी ही ९ सदस्यांची ग्रुप ग्रामपंचायत आहे. या निवडणुकीवेळी भाजपात नवा आणि जुना गट निर्माण झाला. त्यामुळे श्रीहरी तुळशीराम सोडगीर यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम ग्रामविकास पॅनल तर माधवराव देवकते यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम संघर्ष पॅनलमध्ये दुरंगी लढत झाली. ग्रामविकास पॅनलमध्ये नवख्यांना तर संघर्ष पॅनलमध्ये जुन्या मोहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. निवडणुकीत गावचा विकास, मुलभूत सुविधांवर आरोप- प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे ही निवडणूक अतितटीची झाल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले होते.
मंगळवारी मतमोजणी झाल्यानंतर या ग्रुप ग्रामपंचायतीवर सोडगीर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केल्याचे दिसून आले. या पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार संगमेश्वर सोडगीर हे विजयी झाले. तसेच सदस्य पदी गणपती देवकते, मालनबी मौला शेख, विठ्ठल चिटगीर, तुळसाबाई तात्याराव धुळगंडे, सुमनबाई सुभाष जाभाडे, संभा केवले, शाहुबाई देवकते, नागरबाई प्रल्हाद चौथरे हे विजयी झाले. संघर्ष पॅनलच्या एकमेव नंदाबाई वडगावकर विजयी झाल्या आहेत.
तरुणांई जाणून घेऊन उमेदवारी...
गावातील युवकांनी या निवडणुकीत युवा पिढीला संधी द्यावी, अशी मागणी सुरु केली होती. युवकांची मते जाणून घेऊन युवकांना संधी दिली. मतदारांनीही तरुणांना विजयश्री मिळवून दिली. गावच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द आहोत.
- श्रीहरी सोडगीर, विजयी पॅनलप्रमुख.
आनंद शब्दात सांगता येईना...
मी सध्या बीए तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. गावातील युवक आणि ज्येष्ठांमुळे सरपंचपदासाठी रिंगणात उतरलो आणि विजयीही झालो. त्यामुळे सर्वाधिक आनंद झाला आहे. तो शब्दात सांगता येत नाही. मतदारांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही.
- संगमेश्वर सोडगीर, विजयी सरपंच.