इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ पासून एम. ए. पदवीच्या अभ्यासक्रमात फलज्योतिष विषयाचा समावेश करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याचे समजते. फलज्योतिष हे शास्त्र नाही. कारण शास्त्र ठरण्यासाठी निरीक्षण, तर्क, संरचना, प्रश्न, सामान्यीकरण, अनुमान, प्रचिती, प्रयोग या कसोटीवर ते उतरत नाही. यासाठी हा विषय अशास्त्रीय आणि कालबाह्य झालेला आहे. संविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांशी पूर्णपणे विसंगत आहे, असे महाराष्ट्र अंनिसने निवेदनात नमूद केले आहे. फलज्योतिष हे शास्त्र म्हणून सिद्ध केल्यास २१ लाख रुपयांचे देण्याचे आव्हान २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र अंनिसने दिले आहे. फलज्योतिषसारखा कालबाह्य आणि अशास्त्रीय विषयाला भारतीय परंपरा, संस्कृतीच्या नावाखाली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करणे म्हणजे नव्या पिढीला एकूणच भारतीय समाजाला पुन्हा मानसिक गुलामीच्या जोखडात अडकवणे, दैववादी बनवून अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलणे हाच प्रयत्न आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, महिला विभागाच्या राज्य सहकार्यवाह रुक्साना मुल्ला, जिल्हा प्रधान सचिव बाबा हलकुडे, सुधीर भोसले, शहर कार्याध्यक्ष प्रा. डाॅ. दशरथ भिसे, बुवाबाजी विरोधी संघर्ष जिल्हा कार्यवाह रणजित आचार्य यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
फलज्योतिष्याचा अभ्यासक्रमात समावेश करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST