संघटनेच्या क्रीडा स्पर्धांनी मैदाने गजबजण्याची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:28+5:302021-01-20T04:20:28+5:30
लातूर : २०२० सालात आलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसला. क्रीडा क्षेत्रही यात अपवाद राहिले नाही. ना सराव ...

संघटनेच्या क्रीडा स्पर्धांनी मैदाने गजबजण्याची आशा
लातूर : २०२० सालात आलेल्या कोरोनाच्या महामारीचा फटका सर्व क्षेत्राला बसला. क्रीडा क्षेत्रही यात अपवाद राहिले नाही. ना सराव ना स्पर्धा अशा मन:स्थितीत खेळाडू राहिले. मात्र, नव्या उमेदीने कोरोनावर मात करीत क्रीडा क्षेत्राने २०२१ सालात नूतन वर्षाचा चंग बांधला असून, संघटनेच्या स्पर्धा होत असल्याने खेळाडूंच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, शालेय स्पर्धा न झाल्याने शालेय खेळाडूंचा मात्र हिरमोड झाला. स्पर्धेत आपले कर्तृत्व सिद्ध करून खेळाडू जिंकण्यासाठी धडपडतो. खेळातील विजयाच्या जोरावरच आगेकूच करीत संघ तथा खेळाडू पुढे वाटचाल करतात. याचा फायदा त्यांना अनेक ठिकाणी होतो. क्रीडा ग्रेस गुण असो किंवा नोकरी आरक्षण असो, स्पर्धा झाली, तरच हे फायदे खेळाडूंना मिळतात. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या सालात स्पर्धाच झाली नाही. मात्र, शासनाच्या परवानगीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे लवकरच कुस्ती खेळाडी निवड चाचणी ठिकठिकाणी होणार आहे. त्यामुळे क्रीडा क्षेत्राच्या स्पर्धेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यासह व्हॉलीबॉल संघटनेनेही राज्यस्तरीय स्पर्धेचा कार्यक्रम आखला आहे. त्यामुळे स्पर्धा होण्याची चिन्हे आहेत. खो-खो संघटनेनेही शासनाकडे स्पर्धेसाठी परवानगी मागितली आहे. यासह विविध खेळांच्या संघटनेमार्फत आयोजित स्पर्धा होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. एकंदरित, संघटनेच्या रूपाने का होईना, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मैदाने पुन्हा गजबजण्याची चिन्हे आहेत.
उदगीरात दीडशे खेळाडू झाले सहभागी...
१५ जानेवारी रोजी उदगीर येथे मैदानी खेळांच्या संघटनेमार्फत जिल्हास्तरीय निवड चाचणी घेण्यात आली. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी १४, १६, १८ व २० या वयोगटांतील खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली.
शालेय स्पर्धेचा फटका
यंदाच्या वर्षात शालेय स्पर्धा न झाल्याने शालेय खेळाडूंना याचा फटका बसणार आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत शालेय स्तरावरील राष्ट्रीय स्पर्धा होतात. मात्र, कोरोनामुळे कुठल्याही स्तरावरच्या स्पर्धा यंदा झाल्या नाहीत. त्यामुळे क्रीडा ग्रेस गुणांसह अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
स्पर्धा होत असल्याचा आनंद...
कोरोनाने क्रीडा क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शालेय स्पर्धा झाल्या नाहीत. मात्र, शासनाने परवानगी दिल्याने अनेक एकविध संघटनेच्या खेळांच्या स्पर्धा होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे आनंद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विस्कटलेली घडी पुन्हा रुळावर येईल व खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते गोविंद पवार म्हणाले.