अवैध वाळू उपसा केलेल्यांच्या मालमत्ता, सातबारावर चढविला बोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:10+5:302021-07-25T04:18:10+5:30
रेणापूर : मांजरा नदी पात्राशेजारील काही शेतकरी, व्यापाऱ्यांनी अवैधरीत्या वाळू उपसा करून त्याची साठवण केली होती. प्रशासनाने धाडी टाकून ...

अवैध वाळू उपसा केलेल्यांच्या मालमत्ता, सातबारावर चढविला बोजा
रेणापूर : मांजरा नदी पात्राशेजारील काही शेतकरी, व्यापाऱ्यांनी अवैधरीत्या वाळू उपसा करून त्याची साठवण केली होती. प्रशासनाने धाडी टाकून दंड आकारला. परंतु, तो न भरल्याने अखेर २० जणांच्या मालमत्तेवर, सातबारावर २ कोटी ९२ लाख १२ हजार ६६५ रुपयांचा बोजा महसूल प्रशासनाने चढविला आहे.
रेणापूर तालुक्यातून मांजरा नदी वाहते. तालुक्यातील आरजखेडा, दर्जी बोरगाव, सांगवी, डिगोळ देशमुख, मोटेगाव, सिंधगाव या शिवारातून मांजरा नदीचे पात्र आहे. नदीकाठच्या शेतीतून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो. व्यापारी, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून विक्री केली जाते. तसेच वाळूचा साठाही केला जातो. गेल्या महिन्यात महसूल विभागाला मोठ्या प्रमाणात वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महसूलच्या अधिकाऱ्यांनी संबंधित गावात धाडी टाकल्या. तेव्हा वाळू साठवून ठेवल्याचे आढळून आले. ती वाळू जप्त करून संबंधितांवर कार्यवाही केली. जप्त वाळूच्या लिलावाची परवानगी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यात कोणीही सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे कारवाई केलेल्या संबंधितांवर जमीन महसूल अधिनियमानुसार नोटिसा काढून प्रत्येकाला दंड आकारण्यात आला.
या दंडाची नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याचा भरणा करणे आवश्यक होते. परंतु, २० जणांनी दंडाची रक्कम न भरल्यामुळे महसूल प्रशासनाने कायद्यान्वये संबंधितांच्या मालमत्तेवर, सातबारावर बोजा चढविला आहे. त्यात सिंधगाव येथील धनंजय चव्हाण यांच्यावर १ लाख १७ हजार ४५०, विलास चेवले- २ लाख ३४ हजार ९००, महेबुब शेख- ५८ हजार ७२५, बंदेनवाज शेख- ४६ हजार, दर्जी बोरगाव येथील शहाबुद्दीन शेख- २ लाख ९३ हजार ६२५, सांगवीतील भीमाशंकर जाधव- १ लाख ४० हजार ९४०, शरद सावंत- ८२ हजार २१५, उत्तम नाडे- ७० हजार ४७०, काकासाहेब जाधव- ८२ हजार २१५, अतुल राजाराम बोडके- २३ हजार ४९०, आरजखेडा येथील भारत मनोहर सूर्यवंशी- ८२ हजार २१५, समाधान दादाराव सूर्यवंशी- ५८ लाख ७२ हजार ५००, दादाराव सूर्यवंशी- ५८ लाख ७२ हजार ५००, भारत सूर्यवंशी- २ लाख ३४ हजार ९००, डिगुळ देशमुख येथील गोविंद वडवळे- ३० लाख, अमृता देशमुख- १ कोटी १७ लाख, पांडुरंग शिंदे- २१ लाख ६ हजार, संदीपान इंगळे- २ लाख ९२ हजार ५०० तर मोटेगाव येथील सुदर्शन पवार- ५ लाख ८५ हजार, राम इंगळे- २ लाख ३४ हजार ९०० अशा एकूण २० जणांचा समावेश आहे, अशी माहिती तहसीलदार राहुल पाटील यांनी दिली.
कार्यवाहीमुळे वाळू उपसा थांबेल...
नदीकाठच्या भागातून मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या वाळू उपसा होतो. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतोच. त्याचबरोबर गावातील नागरिकांना वाहनांचा मोठा त्रास होतो. अवैधरीत्या वाळू वाहतुकीमुळे चांगल्या रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. या कार्यवाहीमुळे अवैध वाळू उपसा थांबण्यास मदत होईल, असे तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले. अशी कार्यवाही सातत्याने सुरू राहील, असेही ते म्हणाले.