आष्टामाेड - उदगीर महामार्गावरील धुरळ्याने प्रवासी त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:18+5:302021-03-16T04:20:18+5:30
डिगोळ : जिल्ह्यातील आष्टामाेड ते उदगीर या महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील धुराळ्यामुळे ...

आष्टामाेड - उदगीर महामार्गावरील धुरळ्याने प्रवासी त्रस्त
डिगोळ : जिल्ह्यातील आष्टामाेड ते उदगीर या महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील धुराळ्यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक, प्रवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी खाेदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवासाला दुप्पट वेळ लागत आहे. महामार्गाच्या कामासाठी ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या मातीमुळे धुरळ्यात हा रस्ताच हरवून गेला आहे. यातून अपघाताच्या घटनांमध्येही अलिकडे वाढ झाली आहे.
लातूर - आष्टामाेड ते उदगीर या प्रमुख मार्गाचे उदगीर - रेणापूर या नावाने राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. या महामार्गाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. रस्त्यावरील तिवटघाळपाटी ते येरोळमोडपर्यंतच्या या रस्त्याची गत दोन वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. गत पावसाळ्यापासून तर रस्त्याचे चित्रच बदलून गेले आहे. या रस्त्यावरुन प्रवास करणे आता कठीण झाले आहे. प्रवासालाही दुप्पट वेळ लागत आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने सध्या या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. रस्त्यालगत खोदकाम करून मुरूम भरण्याचे काम सुरु आहे. मात्र, सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या पूर्वीच्या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्गाच्या नावावर दुर्लक्ष केले जात आहे. प्रवाशांकडून होणारी ओरड पाहून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर मातीचा वापर केला आहे. मातीवर पाण्याचा वापर न केल्याने धुरळा उडत आहे. या धुराळ्यात हा रस्ताच हरवून जात आहे. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढले असून, धुराळ्यामुळे रस्त्यालगत असलेल्या गावांतील ग्रामस्थ, वाहनचालक, प्रवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली आहे त्या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यातून प्रवासी, वाहनचालकांची माेठ्या प्रमाणात हेळसांड हाेत आहे.