बेलकुंड (जि. लातूर) : अतिवृष्टीचे अनुदान मंजूर होऊन पंधरा दिवस उलटले. मात्र, अद्यापही ते बँक खात्यावर जमा न झाल्याने औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संतप्त शेतकऱ्यांनी औश्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बुधवारी ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या या पावित्र्यामुळे बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले.
जिल्ह्यात सातत्याने झालेल्या संततधार पावसामुळे तसेच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अनुदान जाहीर करुन दिवाळीपूर्वी अनुदान खात्यावर वर्ग होईल, असे सांगितले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आणि दिवाळीचा तरी सण साजरा होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली. दरम्यान, दिवाळी झाली तरी अद्यापही नुकसानग्रस्तांच्या खात्यावर अनुदान वर्ग झाले नाही.
तहसील प्रशासन आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या औसा शाखेतील दप्तर दिरंगाईमुळे बेलकुंड व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या अनुदान रखडले. विशेष म्हणजे, येथील बहुतांश शेतकऱ्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आशिव शाखेत आहे. त्यांना यापूर्वीच अनुदान मिळाले. मात्र ज्या शेतकऱ्यांचे खाते येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आहे, त्या शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा लागली होती.
अनुदानासाठी आठ- दहा दिवसांपासून शेतकरी बँकेकडे हेलपाटे मारत होते. मात्र, बँकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर बुधवारी येथील संतप्त शेतकऱ्यांनी सरपंच विष्णू कोळी यांच्यासह औश्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांचा आक्रमक पावित्रा पाहून बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग केले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.