जळकोट बाजार समितीतील शेतीमालाची आवक घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:22 IST2021-01-16T04:22:45+5:302021-01-16T04:22:45+5:30
जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० ते ६० आडत दुकाने आहेत. येथील बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला ...

जळकोट बाजार समितीतील शेतीमालाची आवक घटली
जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० ते ६० आडत दुकाने आहेत. येथील बाजार समितीत तालुक्यातील ४७ गावांतील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे जानेवारीत दर वर्षी चांगली आवक होऊन उलाढाल होत असते. परंतु, यंदा तालुक्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन गेले. त्यानंतर तुरीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश गावातील तुरीचा खराटा झाला. ज्वारी काळी पडली. परिणामी, आवक घटली आहे.
शेती उत्पादन झाले नसल्याने बाजार समितीत आवक नाही. परिणामी, बाजार समितीतील व्यापाऱ्यांसह हमाल, मापाडी हैराण झाले आहेत. तुरीचे नुकसान होऊनही त्याचे पंचनामे झाले नाहीत. तसेच अद्यापही खरीप हंगामातील पिकांचा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे.
उलाढाल मंदावली...
जळकोट कृषी उत्पन्न बाजार समिती दरवर्षी या दिवसांत तुरीची ५०० ते ७०० पोत्यांची आवक असते. तसेच सोयाबीनची हजार ते बाराशे पोत्यांपर्यंत आवक होत असते. परंतु, यंदा अतिवृष्टीमुळे ही पिके हातची गेली आहे. त्यामुळे सध्या दररोज ५० ते १०० पोते शेतमालाची आवक होत आहे. परिणामी, येथील आर्थिक उलाढाल मंदावली आहे, असे जळकोट बाजार समितीचे प्रशासक अमोल वाघमारे व सचिव बालाजी उगिले यांनी सांगितले.