लातुरात आरोग्यवर्धिनी केंद्रांना मिळेना गती; महापालिकेचे महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे दुर्लक्ष
By हणमंत गायकवाड | Updated: April 17, 2023 19:01 IST2023-04-17T19:01:28+5:302023-04-17T19:01:53+5:30
आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीच्या कामात मनपा मागे...

लातुरात आरोग्यवर्धिनी केंद्रांना मिळेना गती; महापालिकेचे महत्त्वाकांक्षी उपक्रमाकडे दुर्लक्ष
लातूर : गोरगरिबांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी जिल्ह्यात २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि दहा ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासनाचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेअंतर्गत असलेली बहुतांश आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित झाले आहेत. मात्र, लातूर महानगरपालिका अंतर्गत असलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कामकाजाला कासव गती आहे. अनेक आरोग्यवर्धिनी केंद्रांची जागाही निश्चित झाली नाही. सद्य:स्थितीत कागदावरच कामकाज चालू आहे. सेवेला अद्याप प्रारंभ नाही.
लातूर महानगरपालिकेअंतर्गत एकूण १२ आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. त्यात एक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल. दवाखान्याची जागा, इमारत निश्चित करून ७ एप्रिलपासून आरोग्य सेवेला प्रारंभ व्हावा असे अपेक्षित होते. मात्र, शहरातील एकही आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू झालेले नाही. मनपा शाळा क्रमांक चार ठाकरे चौक, वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर, मनपा शाळा खोरे गल्ली, इंदिरानगर समाज मंदिर, मनपा शाळा क्रमांक पाच, नेहरू शाळेजवळ खोरे गल्ली, सिद्धार्थ समाज मंदिर संजय नगर आणि मनपा शाळा क्रमांक दोन काळे गल्ली या आठ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू होतील, असे मनपाने निश्चित केले आहे. मात्र, आणखी चार आरोग्यवर्धिनी केंद्रांची जागा निश्चित झालेली नाही. त्यामुळे आरोग्य सेवेला कधी प्रारंभ होईल हे सांगता येत नाही. ७ एप्रिल किंवा १५ एप्रिलपासून प्रत्यक्ष आरोग्य सेवा त्या परिसरातील नागरिकांना मिळावी असा हेतू या आरोग्यवर्धिनी केंद्राचा आहे. मात्र, अद्याप केंद्र कार्यान्वित झाले नाहीत. कामगार दिनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाचे शासन स्तरावरून एकाच वेळी डिजिटल पद्धतीने उद्घाटन होणार आहे. इकडे मनपाची मात्र अद्याप कसलीच तयारी दिसत नाही. ठाकरे चौकात शाळा क्रमांक चार या ठिकाणी आपला दवाखाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण सद्य:स्थितीत या ठिकाणाहूनही आरोग्य सेवा सुरू नाही.
आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणीच्या कामात मनपा मागे...
भाड्याने अथवा स्वतःच्या इमारतीमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्र तत्काळ सुरू करून गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा द्यावी, असे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या बहुतांश आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत सेवेला प्रारंभ झाला आहे. मात्र, लातूर मनपा मागे पडली आहे, हे वास्तव.