जिल्ह्यात नवीन तीन फिरते पशुचिकित्सालय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:21+5:302021-02-05T06:24:21+5:30
जिल्ह्यात एकूण १० लाख १४ हजार ७१७ पशुधनांची संख्या आहे. त्यात मोठ्या पशुधनांची संख्या ६ लाख १४६, शेळ्या- मेंढ्या ...

जिल्ह्यात नवीन तीन फिरते पशुचिकित्सालय मंजूर
जिल्ह्यात एकूण १० लाख १४ हजार ७१७ पशुधनांची संख्या आहे. त्यात मोठ्या पशुधनांची संख्या ६ लाख १४६, शेळ्या- मेंढ्या १ लाख ६४ हजार १५९, कोंबड्या १ लाख ५९ हजार ७५९ व इतर जनावरांची १४ हजार ४४६ अशी संख्या आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत श्रेणी- १ ची ३१ पशुवैद्यकीय दवाखाने, श्रेणी- २ ची ९२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, बाभळगाव, रेणापूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर येथे तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालये आहेत.
शासनाच्या नियमांनुसार ५ हजार पशुधन घटकामागे एक पशुवैद्यकीय दवाखाना असणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील पशुधनाची संख्या पाहता ती कमी आहे. परिणामी, ग्रामीण भागातील पशुपालकांना पशुधनावर उपचारासाठी बहुतांशवेेळेस खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, जिल्ह्यात नव्याने तीन फिरते पशुचिकित्सालये मंजूर झाली आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यातील व वाडी-तांड्यावरील पशुधनपालकांना दिलासा मिळालाा आहे.
लवकरच कार्यान्वित होतील...
शासनाने देवणी, लातूर ग्रामीण आणि औसा येथे नवीन तीन फिरते पशुचिकित्सालये मंजूर केली आहेत. ती लवकरच कार्यान्वित होतील. या चिकित्सालयामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर, वाहन, कर्मचारी उपलब्ध राहणार आहेत. त्यातून सर्वप्रकारच्या पशुवैद्यकीय सेवा मिळणार आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी सांगितले.