दोन वर्षांपूर्वी खरोसा पाणीपुरवठा पुनरुज्जीवनाला मंजुरी; योजना रखडलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:43+5:302021-04-21T04:19:43+5:30

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ६ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली ...

Approval of Kharosa water supply revival two years ago; Plan stalled | दोन वर्षांपूर्वी खरोसा पाणीपुरवठा पुनरुज्जीवनाला मंजुरी; योजना रखडलेली

दोन वर्षांपूर्वी खरोसा पाणीपुरवठा पुनरुज्जीवनाला मंजुरी; योजना रखडलेली

खरोसा : औसा तालुक्यातील खरोश्यासह परिसरातील ६ गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, थकीत वीज बिलामुळे ९ वर्षांपासून ती बंद आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास २०१८ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली; परंतु अद्यापही योजना सुरू न झाल्याने ९ गावांचा पाणी प्रश्न बिकट बनला आहे.

औसा तालुक्यातील खरोसा व परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि तेथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ऑगस्ट २००६ मध्ये साडेअकरा कोटी खर्चून सहा खेडी पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. ही योजना निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पातून कार्यान्वित झाली होती. प्रारंभी, या योजनेंतर्गत खरोसा, शेडोळ, किनीनवरे, तांबरवाडी, चलबुर्गा, जावळी या गावांचा समावेश होता. मात्र, त्यानंतर आनंदवाडी, जाऊ, मोगरगा, अशा तीन गावांना यात समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे ही योजना नऊ गावांसाठी सुरू झाली.

गत पावसाळ्यात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे मसलगा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला. मात्र, ९ गावांच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा योजनेतील ९ गावांत सार्वजनिक हातपंप ६६, बोअर २५ आणि विहिरी १६ आहेत. एवढे पाण्याचे स्रोत असतानाही चलबुर्गा गाव वगळता उर्वरित आठही गावांना कमी- अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत.

सदरील पाणीपुरवठा योजना लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी खरोश्यासह इतर गावांच्या ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे खरोसा सहा खेडी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सादर केला होता. त्यास शासनाने डिसेंबर २०१८ मध्ये मंजुरीही दिली. त्याअंतर्गत ४ कोटी ३५ लाखांच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली. शासनाच्या मंजुरीमुळे वर्षभरात विद्युत मोटारी जलवाहिनी, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, अशी ५० टक्के दुरुस्तीची कामे झाली. उर्वरित कामे कोरोनाच्या संसर्गामुळे आणि वीज जोडणी नसल्यामुळे थांबली असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सांगण्यात आले.

मसलगा प्रकल्पात ४४ टक्के उपयुक्त पाणी

मसलगा प्रकल्पात ४४.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

मसलगा धरणावरील एकूण थकबाकीच्या निम्मी ५२ लाख ५६ हजार ८४६ आणि खरोसा डोंगरावरील जलशुद्धीकरण केंद्राची एकूण वीज थकबाकीच्या निम्मी ७ लाख ५० हजार ७३९ रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने ९ फेब्रुवारी २०२१ रोजी भरल्याचे प्राधिकरणकडून सांगण्यात येते. उर्वरित ५० टक्के वीज बिल थकबाकी राज्य सरकार भरणार असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणने वीजजोडणी केल्यास पुढील दुरुस्तीची कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी आशा आहे.

Web Title: Approval of Kharosa water supply revival two years ago; Plan stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.