चाकूर येथील केंद्रीय विद्यालयात पहिली ते आठवीच्या तुकडी वाढीस मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:47+5:302021-09-08T04:25:47+5:30
चाकूर : येथील केंद्रीय विद्यालयात १ ली ते ८वी वर्गाच्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली; परंतु तुकडी वाढत नव्हती. खासदार ...

चाकूर येथील केंद्रीय विद्यालयात पहिली ते आठवीच्या तुकडी वाढीस मंजुरी
चाकूर : येथील केंद्रीय विद्यालयात १ ली ते ८वी वर्गाच्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली; परंतु तुकडी वाढत नव्हती. खासदार सुधाकरराव शृंगारे यांनी या तुकडी वाढविण्यासाठी सतत पाठपुरावा करून लोकसभेत मागणी लावून धरली होती. त्या पाठपुराव्यास अखेर यश आले आहे. केंद्रीय विद्यालय येथे १ ते ८ वी वर्गाची तुकडी वाढीस केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून अखेर मंजुरी मिळाली आहे.
केंद्रीय विद्यालय येथे नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. केंद्रीय विद्यालयाकडून वर्ग १ ते १० पर्यंत नवीन वर्ग व विभाग सुरू करण्यासाठी संबंधिताकडे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित करून व केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. चाकूरस्थित केंद्रीय विद्यालयात अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यास पात्र आहेत; परंतु विद्यार्थी व वर्ग खोल्यांची क्षमता कमी असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे शक्य होत नव्हते. खासदार शृंगारे यांनी इयत्ता १ली ते १० पर्यंतच्या प्रत्येक वर्गात एक विभाग वाढवावा, अशी मागणी केली होती; परंतु जागेच्या अभावामुळे ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले होते. सद्य:स्थितीत केंद्रीय विद्यालयात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. नवीन इमारतीत ही शाळा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नवीन इमारतीत पुरेसा विभाग व वर्गखोल्या देखील उपलब्ध आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून तुकडी सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. चाकूर व या भागातील विद्यार्थ्यांना या तुकडी वाढीमुळे शिक्षणाची सोय होईल, असा विश्वास खा. सुधाकरराव श्रृंगारे यांनी व्यक्त केला आहे.