उदगीर रेल्वे स्थानकातून शेतीमालाच्या निर्यातीसाठी मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST2021-08-22T04:23:38+5:302021-08-22T04:23:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : येथील रेल्वे स्थानकातून शेतीमाल निर्यात करण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेशीम, भाज्या, ...

Approval for export of agricultural commodities from Udgir railway station | उदगीर रेल्वे स्थानकातून शेतीमालाच्या निर्यातीसाठी मंजुरी

उदगीर रेल्वे स्थानकातून शेतीमालाच्या निर्यातीसाठी मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क

उदगीर : येथील रेल्वे स्थानकातून शेतीमाल निर्यात करण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रेशीम, भाज्या, फळे, फुले आदी छोट्या प्रमाणात असतील तरीही शेतकरी मोठ्या बाजारपेठेपर्यंत स्वस्त दरात वाहतूक करू शकतील. शेतकऱ्यांना या उपक्रमाचा फायदा होणार आहे.

उदगीर शहरासह सीमावर्ती भागात रेशीम शेती मोठ्या प्रमाणात असून, त्याची मुख्य बाजारपेठ बंगळुरू आहे. उदगीर रेल्वे स्थानकातून दररोज बंगळुरूसाठी रेल्वे आहे. मात्र, एक्सप्रेस गाडी असल्याने माल निर्यात व्यवस्था करता येत नव्हती. त्यामुळे शेतकरी कमी भावात मोठ्या बाजारपेठेपर्यंत आपल्या मालाची वाहतूक करून विक्री करू शकत नव्हते. यामुळे स्थानिक बाजारपेठेत शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हता. याबाबतीत शेतकऱ्यांनी उदगीर रेल्वे संघर्ष समितीला सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाशी संपर्क करून पाठपुरावा केला. नुकतेच दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने संघर्ष समितीला रेशीम कोषासह इतर शेती उत्पादने निर्यात करण्यासाठी अनुकूलता दर्शवली असल्याचे कळवले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन उदगीर स्थानकातून देशातील मोठ्या बाजारपेठेत निर्यात करण्याची व्यवस्था उपलब्ध झाली आहे. मोदी सरकार देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवत आहे. आता उदगीर व परिसरातील शेतकरी भाज्या, फळे, फुले प्रमुख शहरांत त्वरित आणि कमी खर्चात निर्यात करू शकतील. निर्यात करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी उदगीर रेल्वे संघर्ष समितीशी संपर्क करावा, असे आवाहन सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी केले आहे.

रेल्वेच्या उत्पन्नात पडणार भर...

मार्च २०२१पासून उदगीर रेल्वे स्थानकात मालधक्का मंजूर झाला. सोयाबीन व साखर निर्यातीतून आतापर्यंत २ कोटी ६७ लाख रुपयांचे उत्पन्न रेल्वेने प्राप्त केले आहे. आता छोट्या शेतकऱ्यांसाठी निर्यात केंद्र मंजूर झाल्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात आणखी भर पडणार आहे. सोबतच शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी नेता येणार आहे.

Web Title: Approval for export of agricultural commodities from Udgir railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.