कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:54+5:302021-02-06T04:33:54+5:30
५ वी ते ८ वी उपस्थितीचे प्रमाण वाढले लातूर : जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करीत ५ वी ते ८ ...

कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आवाहन
५ वी ते ८ वी उपस्थितीचे प्रमाण वाढले
लातूर : जिल्ह्यात कोरोना नियमांचे पालन करीत ५ वी ते ८ वीचे वर्ग नियमित सुरू झाले आहेत. शाळांमध्ये मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी उपाययोजनांचे नियमितपणे पालन केले जात आहे. पहिल्या दिवशी ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्यामध्ये वाढ होत असून, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिसून येत आहे. शाळांच्या वतीनेही खबरदारी घेत नियमित वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. दररोज हजार ते दीड हजार व्यक्तींच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे. अनेकजण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असून, आरोग्य विभागातर्फे नियमावली देण्यात आली आहे.
जेवळी रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची गैरसोय
लातूर : तालुक्यातील जेवळी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निवेदनही देण्यात आले आहे. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
बाजार समितीत तुरीची आवक वाढली
लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून, गुरुवारी ७ हजार ८८७ क्विंटल तुरीची आवक झाली. त्याला ६ हजार ६३१ कमाल, ६ हजार १ किमान तर ६ हजार ४५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. यासोबतच सोयाबीनची १८ हजार ९६२ क्विंटलची आवक झाली. त्याला ४ हजार ४५० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला. सध्या गहू, गूळ, रबी ज्वारी, मका, हरभरा, उडीद, तीळ, करडई आदी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
बार्शी रोडवरील पथदिवे दुरुस्तीची मागणी
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पथदिवे दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. काही ठिकाणी पथदिवे सुरू करण्यात आले असले तरी बार्शी रोडवरील पथदिवे बंद आहेत. या पथदिव्यांची तात्काळ दुरुस्ती हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
लोककला समितीवर बंकट पुरी यांची निवड
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने लोककला शासकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर लोककला अभ्यासक म्हणून बंकट पुरी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सहायक माहिती अधिकारी यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल बंकट पुरी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सदस्य पदासाठी अर्ज सादर करावेत
लातूर : अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर १५ अशासकीय सदस्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. तहसील कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले असून, प्रवर्गनिहाय तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. इच्छुकांनी ३० दिवसांच्या आत आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषी विभागातर्फे आज कार्यशाळा
लातूर : कृषी व आत्मा विभागाच्या वतीने डीपीडीसी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता कार्यशाळेस प्रारंभ करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, नानाजी देशमुख संजीवनी कृषी प्रकल्प, कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, गटशेती, जिल्हा उद्योग केंद्रातील विविध योजनांबाबत माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.