हातात तलवार घेऊन आक्षेपार्ह फाेटो टाकणारा आणखी एक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:57+5:302021-04-06T04:18:57+5:30
पोलिसांनी सांगितले, सोशल मीडियात एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट दिसून आली.त्यामध्ये एक इसम हातामध्ये उघडी तलवार घेऊन फोटो काढून ते ...

हातात तलवार घेऊन आक्षेपार्ह फाेटो टाकणारा आणखी एक गजाआड
पोलिसांनी सांगितले, सोशल मीडियात एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट दिसून आली.त्यामध्ये एक इसम हातामध्ये उघडी तलवार घेऊन फोटो काढून ते फेसबुक वर पोस्ट करून त्यावर "थोडे दिवस थांबा शेठ, येणारी वेळ सांगेल की मी काय करू शकतो" असे कॅप्शन टाकून तलवारी सहित एक फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याचे दिसून आले. त्यावर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे व त्यांच्या टीमने सदरील तरूणाचा शोध घेतला असता तो तरूण वैशाली नगर ते बाभळगाव जाणारे रोडवर मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता उमेश गणेश पेंदुर (वय २७, रा. वैशाली नगर) नाव असल्याचे सांगितले. त्याच्याकडून फोटोमधील तलवार जप्त करण्यात आली. याप्रकरणी रवी गोंदकर यांच्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा व १३५ मुंबई पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जागीरदार हे करीत आहेत. कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार खुर्रम काझी, रवी गोंदकर, यशपाल कांबळे यांचा सहभाग होता.
दोन युवकांसह चाकू जप्त...
आणखीन एका प्रकरणामध्ये पोलिसांनी संजय नगर भागातील कृष्णा लहू वाघमारे (२०), कृष्णा शत्रुघ्न धावारे (२१) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक खंजरसारखा चाकू जप्त करण्यात आला आहे. त्या दोघांवरही विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील तीन दिवसात पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण चार जणांव कार्यवाही केलेली आहे. धारदार शस्त्रे बाळगणे बेकायदेशीर असून असे आढळून आल्यास कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोणीही असे करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.