घोषणांचा बाजार; हाती दमडीही पडली नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST2021-05-08T04:19:49+5:302021-05-08T04:19:49+5:30
लातूर : शासनाने कडक निर्बंध लागू करताना फेरीवाला आणि पथ विक्रेत्यांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली. मात्र अद्याप ...

घोषणांचा बाजार; हाती दमडीही पडली नाही!
लातूर : शासनाने कडक निर्बंध लागू करताना फेरीवाला आणि पथ विक्रेत्यांना दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली. मात्र अद्याप दमडीही मिळाली नाही. व्यवसाय बंद अन् मदतही नाही, यामुळे फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लातूर मनपाच्या हद्दीत तीन हजार अधिकृत फेरीवाला पथविक्रेते आहेत. तर ज्यांची नोंद नाही, अशांची संख्या हजार-बाराशेच्या वर आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांना शासनाने लाॅकडाऊन काळात दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली आहे. परंतु, अद्याप एकाही फेरीवाल्याला मदत मिळाली नाही. महानगरपालिकेच्या फेरीवाला समितीकडे मदत कधी मिळणार, याची विचारणा करीत आहेत. मात्र शासनाकडून यासंदर्भात अद्याप कसलाही आदेश आलेला नसल्याचे महानगरपालिकेतून सांगण्यात येत आहे. स्वनिधी आत्मनिर्भर पंतप्रधान कर्ज योजनेत ज्या लाभार्थ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज दिले, त्यांना शासनाने जाहीर केलेला निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप यासंदर्भात कसलाच आदेश नाही.
कोरोनामुळे व्यवसाय बंद आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा आहे. परंतु, बाजारात थांबू दिले जात नाही. त्यामुळे व्यवसाय करता येत नाही. शासनाची मदतही मिळत नाही. काय खावे, असा प्रश्न आहे. शासनाने लवकर मदत केली असती तर एक महिना उदरनिर्वाह झाला असता.
- शादुल शेख, लातूर
कोरोनाच्या संकटामुळे बाजार बंद आहे. त्यामुळे आम्हाला दिवसभर व्यवसाय करू दिला जात नाही. व्यवसायाला यावे तर गाडे जप्त केले जातात. त्यामुळे फळ विक्रीचा व्यवसाय करता येत नाही. शासनाने मदत करण्याची घोषणा केली आहे. दोन-तीन दिवसांत पैसे मिळतील, असे साहेबांनी सांगितले आहे.
- सलमान तांबोळी, लातूर
शासनाकडून दीड हजार रुपये मिळणार असल्याचे फेरीवाला समितीने सांगितले आहे. आधार कार्ड आणि बँकेचे खाते संलग्न करून ठेवले आहे. बँक खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप मदत जमा झालेली नाही. व्यवसाय बंद असतानाच्या काळात मदत मिळाली असती तर बरे झाले असते. परंतु, मदतही नाही आणि व्यवसायही नाही, अशी स्थिती आहे. यामुळे आमची उपासमार होत आहे.
- संदीप कांबळे, लातूर