कोरोना महामारीची वर्षपूर्ती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:40+5:302021-04-04T04:19:40+5:30
गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील १२ जणांचा जथा हरयाणा राज्यातून गावाकडे निघाला होता. हे सर्व जण निलंगा ...

कोरोना महामारीची वर्षपूर्ती !
गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील १२ जणांचा जथा हरयाणा राज्यातून गावाकडे निघाला होता. हे सर्व जण निलंगा येथे मुक्कामी थांबले होते. तेव्हा आरोग्य विभागाने त्यांची तपासणी केली करून स्वॅब घेतले असता त्यातील ८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार करण्यात येऊन गावी पाठविण्यात आले होते. त्यानंतर उदगीरमध्ये एक बाधित आढळला होता आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला. तेथून पुढे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून कॉन्टक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला, तर गावोगावी ॲन्टिकोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली. त्यामुळे शहरातून गावाकडे येणाऱ्यांना पायबंद बसला.
जिल्ह्यात एप्रिलमध्ये केवळ १६ बाधितांची नोंद झाली होती. मे, जूनमध्ये बाधितांचा आलेख स्थिर होता. मात्र, जुलैपासून संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली आणि सप्टेंबरमध्ये सर्वाधिक बाधितांची नोंद झाली. सप्टेंबर महिन्यात ९ हजार १८८ बाधित आढळले होते. त्यानंतर पुन्हा कोरोनाचा आलेख उतरला होता. मात्र, मार्चमध्ये तो पुन्हा उंचावला असून, केवळ एका महिन्यात ८ हजार ५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात औषधसाठा उपलब्ध
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेला औषधांचा पुरेसा साठा आहे. शासकीय रुग्णालयात रेमडिसीवर पुरेशा प्रमाणात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले.
जिल्ह्यात १६ कोविड केअर सेंटर
सध्या जिल्ह्यात १६ कोविड केअर सेंटर आहेत. त्यातील ६ कोविड केअर सेंटरमध्ये बाधितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ७ हजार ४०० खाटा उपलब्ध आहेत. सद्य:स्थितीत काही खाटा शिल्लक आहेत.
...असे वाढले रुग्ण
एप्रिल १६
मे ११९
जून २१४
जुलै १,८५१
ऑगस्ट ५,९११
सप्टेंबर ९,१८८
ऑक्टोबर ३,०२२
नोव्हेंबर १,५५५
डिसेंबर १,१५०
जानेवारी २०२१- १,१९५
फेब्रुवारी २०२१- १,१७५
मार्च २०२१- ८,०५६
सुरुवातीचे बाधित रुग्ण चांगले
जिल्ह्यात सुरुवातीस आढळून आलेल्या आंध्र प्रदेशातील बाधितांवर उपचार करून त्यांना पाठविण्यात आले होते. त्यानंतर उदगीरमध्ये बाधित आढळले होते.
आपले कसे होणार म्हणून सुरुवातीस मनात भीती होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेतल्यानंतर मी कोरोनामुक्त झालो. त्यानंतर कुठलाही त्रास जाणवला नाही. पूर्वीप्रमाणे मी माझा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आढळलेल्या एका बाधिताने सांगितले.