काळजावर दगड ठेवत एक एकरावरील कोबीत सोडली जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:50+5:302021-02-05T06:24:50+5:30
डिगाेळ येथील शेतकऱ्यांनी यंदा वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजारात घरसलेल्या भावाने त्यांचे कंबरडे माेडले आहे. यंदाच्या ...

काळजावर दगड ठेवत एक एकरावरील कोबीत सोडली जनावरे
डिगाेळ येथील शेतकऱ्यांनी यंदा वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाजारात घरसलेल्या भावाने त्यांचे कंबरडे माेडले आहे. यंदाच्या हंगामात बागायती शेती करायचा विचार केला. मात्र, मुबलक पाणीही उपलब्ध नव्हते. त्यासाठी पाहुण्यांची आणि सासुरवाडीची मदत घेऊन शेतात चारशे फूट खोलवर बोअर घेतला. बोअरला चांगले पाणी लागले आहे. या पाण्यावर माेठ्या आशेने भाजीपाल्याची शेती फुलविण्याचा विचार करून मेहनत केली. एका एकरावर कोबीची लागवड केली. यासाठी मलचिंगचा आणि ठिबक सिंचनाचा वापर केला. यासाठी माेठा खर्चही केला आहे. अल्पभूधारक शेतकरी गोपाळ वाडकर यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत डी. एड.पर्यंत झाले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीर या संस्थेत २०१० पासून विनाअनुदानित शाळेवर सेवा सुरू आहे. वेतन नसल्याने जगण्याचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी त्यांनी आपल्या शेतात भाजीपाला पिकवीत उदरनिर्वाह भागवावा, या विश्वासाने हे प्रयाेग केले. मात्र, बाजारातील मातीमाेल भावाने त्यांना अडचणीत आणले आहे.
कोबीला ३० रुपये कॅरेटचा भाव....
कोबी पिकापासून चांगले उत्पन्न मिळेल, या विश्वासातून त्यांनी ५ नाेव्हेंबर राेजी ३० हजार रुपये खर्च करून एक एकरावर दहा हजार कोबीची लागवड केली आहे. कोबी काढणीला आहे. मात्र, सध्या बाजारात कोबीच्या एका कॅरेटला ३० रुपयांचा भाव मिळत आहे. गावा-गावात ऑटाे करून विक्री केली, तरी लागवड खर्च पदरी पडत नसल्याचे शेतकरी वाडकर म्हणाले. काढणीचा खर्च, वाहन भाडे, बाजारात अडत, हमाली आणि मालाला विक्रीतून मिळणारी रक्कम याचा हिशाेबच जुळत नाही. सध्या हा व्यवआर पूर्णत: ताेट्यात आहे. त्यातूनच अखेर कोबीच्या एक एकरावरील शेतीत त्यांनी चक्क जनावरे साेडून दिली.
फोटो ओळी : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील शेतकरी गोपाळ वाडकर यांनी एक एकरावरील कोबीच्या पिकात जनावरे साेडून दिली आहेत.