लातूर : भांडणाचा राग मनात ठेवून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना ७ फेब्रुवारी राेजी पहाटेच्या सुमारास लातुरातील रिंगराेड परिसरात घडली हाेती. या गुन्ह्यातील मयताची ओळख पटली असून, खुनाचा उलगडा झाला आहे. यातील एका आराेपीला विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील बाभळगाव नाका ते सिकंदरपूर चाैकदरम्यान रिंगरोडलगत एका हॉटेलनजीक झाेपलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली हाेती. दरम्यान, मयत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पाेलिसांनी प्रयत्न केले. अखेर ओळख पटली असून, ताे नेकनूर (जि. बीड) तालुक्यातील रहिवासी नजीर पाशा सय्यद असल्याचे समाेर आले. त्यानुसार पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. मयत तरुणाच्या मारेकऱ्याचा पाेलिसांनी शाेध घेतला. सतिष भिमराव वाघमारे (वय ३६ रा. चाटगाव ता. धारूर जि. बीड, ह.मु. विठ्ठलनगर, लातूर) याला राहत्या घरातून ताब्यात घेत कसून चाैकशी केली. पाेलिसी खाक्या दाखवताच आराेपीने गुन्ह्याची कबुली दिली. सतिष वाघमारे आणि मयत नजीर हे मित्र हाेते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये भांडण झाले हाेते. या भांडणाचा मनात राग ठेवून झोपलेल्या नजीर याच्या डोक्यात सतीष वाघमारेने माेठा दगड घातला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आराेपीला पाेलिस पथकाने अटक केली आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूरचे डीवायएसपी रणजीत सांवत यांच्या मार्गदर्शनात विवेकानंद चाैक ठाण्याचे पो.नि. संतोष पाटील, सपोनि. पंकज शिनगारे, वसंत मुळे, पोउपनि. अनिल कांबळे, दगडू बुक्तारे, खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, रवी गोंदकर, राणा देशमुख, संजय बेरळीकर, रमेश नामदास, रामचंद्र गुंडरे, आनंद हल्लाळे, अझहर शेख, इसा शेख, पोउपनि. केंद्रे, पोनि. अशोक अनंत्रे, सपोनि. अमीतकुमार पुणेकर, धनंजय गुट्टे, शैलेश सुडे, गणेश साठे, अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली.