गूढ आवाजाने औसा शहरात भीतीचे वातावरण
By संदीप शिंदे | Updated: January 2, 2024 19:42 IST2024-01-02T19:42:43+5:302024-01-02T19:42:59+5:30
औसा शहरातील हाश्मी चौक, कादरीनगर, सारोळा रोड परिसरात मंगळवारी सकाळी ७:२८ वाजेच्या सुमारास गूढ आवाज आला.

गूढ आवाजाने औसा शहरात भीतीचे वातावरण
औसा : शहरातील काही भागांत मंगळवारी सकाळी ७:२८ वाजता गूढ आवाज आला. त्यामुळे नागरिकांत संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान, या आवाजाची भूकंपमापक केंद्रावर कोणतीही नोंद नसून, हा आवाज भूगर्भातीलही नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
औसा शहरातील हाश्मी चौक, कादरीनगर, सारोळा रोड परिसरात मंगळवारी सकाळी ७:२८ वाजेच्या सुमारास गूढ आवाज आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, हा आवाज भूकंप किंवा भूगर्भातील नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग व तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी तलाठी, मंडलाधिकारी यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. औशाचे तहसीलदार भरत सूर्यवंशी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून याबाबत माहिती घेतली असून, कोणतीही नोंद झालेली नाही.
भूकंपमापक केंद्रावर नोंद नाही...
औसा शहरातील गूढ आवाजाची कोणतीही नोंद भूकंपमापक केंद्रावर झालेली नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
-साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, लातूर