देवणीच्या ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका नादुरुस्त, रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:52+5:302021-05-21T04:20:52+5:30
देवणी : देवणी ग्रामीण रुग्णालयासह संपूर्ण तालुक्यासाठी एकमेव असलेली अत्यावश्यक सेवेची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका महिनाभरापासून सतत बंद पडत आहे. ...

देवणीच्या ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका नादुरुस्त, रुग्णांची गैरसोय
देवणी : देवणी ग्रामीण रुग्णालयासह संपूर्ण तालुक्यासाठी एकमेव असलेली अत्यावश्यक सेवेची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका महिनाभरापासून सतत बंद पडत आहे. परिणामी, काही वेळेस ती धक्का देऊन सुरू करावी लागत आहे. दरम्यान, ही रुग्णवाहिका आठवडाभरापासून दुरुस्तीसाठी लातूरला गेल्याने गरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. परिणामी, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
देवणी तालुक्यासाठी जवळपास ६ ते ७ वर्षांपूर्वी १०८ क्रमांकाची आवश्यक सर्व सुविधांनीयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्याकरिता सोय झाली. तालुक्यातील रुग्णांसह आवश्यकतेनुसार शेजारील तालुक्यातील रुग्णांनाही सेवा मिळत असे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आधार मिळत असे. मात्र, काही दिवसांपासून ही रुग्णवाहिका सातत्याने बंद पडत आहे. गत महिनाभरापासून ती जवळपास बंद अवस्थेतच आहे. दरम्यान, गत आठवड्यात रस्त्यातच ही रुग्णवाहिका बंद पडल्याने अन्य वाहनांचा आधार घेऊन दुरुस्तीसाठी लातूरला पाठविण्यात आली.
ऐन कोरोनाच्या काळात ही रुग्णवाहिका नादुरुस्त राहणे अथवा बंद पडल्यामुळे गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या अडचणीमुळे येथील ग्रामीण रुग्णालय, बोरोळ व वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ क्रमांकाच्या वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. सध्या अत्यवस्थ रुग्णांना तात्काळ अन्य रुग्णालयांत नेण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका महत्त्वाची ठरत होती. काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींसह अधिका-यांनी तालुक्यास भेट देऊन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त...
१०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत आहे. त्यामुळे यासंदर्भात वरिष्ठांना आणि संबंधित कंपनीच्या समन्वयकांना माहिती देऊन वाहन दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. लवकरच दुरुस्ती करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
- डॉ. नीळकंठ सगर, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय.
लवकरच सेवेत दाखल होईल...
ही रुग्णवाहिका दुरुस्तीला आल्यानंतर आणखी काही किरकोळ दुरुस्त्या निघाल्या आहेत. त्यामुळे थोडासा विलंब झाला आहे. लवकरच ती दुरुस्ती करून घेण्यात येईल आणि रुग्णसेवेत दाखल होईल.
- डॉ. संदीप राजहंस, जिल्हा व्यवस्थापक.
===Photopath===
200521\img-20210519-wa0068.jpg
===Caption===
.