घरातच मैदान साकारून साधला निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:38+5:302021-03-08T04:19:38+5:30

लातूर : घराच्या पार्किंगमध्येच शूटिंग रेंज उभारत सराव करणाऱ्या लातूरच्या तेजश्री जाधवरने नेमबाजीत आपले ‘तेज’ दाखवत शानदार प्रदर्शन केले ...

Aiming at the ground at home | घरातच मैदान साकारून साधला निशाणा

घरातच मैदान साकारून साधला निशाणा

लातूर : घराच्या पार्किंगमध्येच शूटिंग रेंज उभारत सराव करणाऱ्या लातूरच्या तेजश्री जाधवरने नेमबाजीत आपले ‘तेज’ दाखवत शानदार प्रदर्शन केले आहे. गतवर्षी केरळ येथे झालेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणीपर्यंत मजल मारून नेमबाजी खेळात निशाणा साधला आहे.

घरची परिस्थिती साधारण. वडील सरकारी दवाखान्यात सिटी स्कॅन टेक्निशियन. अशा परिस्थितीत महागड्या खेळात तिची रूची निर्माण झाली. आई-वडिलांनीही तिच्या खेळाच्या या आवडीला प्राधान्य दिले. सुरुवातीच्या काळात क्रीडा संकुलातील शूटिंग रेंजवर ती सराव करत असे. वडिलांनी तिच्यासाठी शहराती भक्तिनगर येथील घरातच असलेल्या पार्किंगमध्ये दहा मीटर शूटिंग रेंजचा सेट उभा करून दिला. घरच्या घरीच सराव करत तेजश्री तुकाराम जाधवर हिने नेमबाजी खेळात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. कळंब तालुक्यातील ताडगाव येथील मूळची असलेली तेजश्रीला नववीपासून या खेळात रूची झाली. श्री केशवराज विद्यालयात असताना तिने शालेय स्तरावरील राज्यस्तरीय स्पर्धांपर्यंत मजल मारली. इयत्ता दहावीत खेळ व अभ्यास असा दोन्ही समन्वय साधत तिने ९८ टक्के गुण मिळविले. सध्या ती राजर्षी शाहू महाविद्यालयात अकरावी विज्ञान वर्गात शिकत आहे. पुणे, मुंबई, भोपाळ, इंदौर येथे झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट नेमबाजीचे प्रदर्शन करीत तिने आपली चमक दाखविली आहे. केरळ येथे गतवर्षी झालेल्या भारतीय संघाच्या निवड चाचणीत सहभाग नोंदविला होता. मात्र, लॉकडाऊननंतर या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. राज्य स्पर्धेत ६०० पैकी ५९३ गुण घेऊन भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली होती. एकीकडे खेळांकडे वळण्यासाठी मुलींचे पालक धजावतात. मात्र, तेजश्रीच्या आई-वडिलांनी तिची खेळातील रूची पाहून तिला नेहमी पाठबळ दिले. त्यामुळेच ती या खेळात यश पादाक्रांत करत आहे.

जिल्हा नियोजन समितीने दिले बळ...

खेळाची आवड असलेले वडील तुकाराम जाधवर यांनी सुरुवातीला जुनी दीड लाखांची रायफल तेजश्रीला घेऊन दिली. घरातच सरावासाठी शूटिंग रेंजही तिला उपलब्ध करून दिली. खेळातील यश पाहून उस्मानाबादच्या जिल्हा नियोजन समितीने तिला ७ लाखांचा नेमबाजी सेट उपलब्ध करून दिला. त्यात ३ लाखांच्या रायफलचा समावेश होता.

खेळ आणि अभ्यासाचा समन्वय...

गतवर्षी तेजश्री दहावीत होती. सतत स्पर्धेमुळे बाहेरगावी जावे लागत असे. मात्र, तिने खेळ आणि अभ्यास असा दोन्ही समन्वय राखत इयत्ता दहावीत ९८ टक्के गुण मिळविले. खेळातही दहावीच्या वर्षात चमकदार कामगिरी करत तिने यश संपादन केले. असा दुहेरी समन्वय साधने कठीणच असते. त्यामुळे तेजश्रीचे या बाबीसाठी विशेष कौतुक होते.

Web Title: Aiming at the ground at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.