अहमदपूरच्या पाणीप्रश्नावर पुन्हा विधानसभेत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:27+5:302021-03-04T04:35:27+5:30
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लिंबाेटी प्रकल्पावरून याेजना राबविण्यात येत आहे. मात्र, या याेजनेला अद्यापही मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. ...

अहमदपूरच्या पाणीप्रश्नावर पुन्हा विधानसभेत चर्चा
अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लिंबाेटी प्रकल्पावरून याेजना राबविण्यात येत आहे. मात्र, या याेजनेला अद्यापही मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. गेल्या काही महिन्यांपासून सदरची पाणीपुरवठा याेजना रखडली आहे. त्यातच नव्या पाईपलाईनवर नळजोडणीसाठी अनधिकृतपणे विनापावती दाेन हजारांचे शुल्क वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातच कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरण मात्र कामाच्या प्रगती, दर्जाबाबत कुठलेही उत्तर देण्यास तयार नाही. यामध्ये नागरिकांचे मात्र हाल होत असून, विकतच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाणी विकत घेतल्याशिवाय मिळत नसत्याची सध्याला परिस्थिती आहे. अहमदपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या लिंबोटी प्रकल्पावरून १९ किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. शहरातील २१ लक्ष लिटर, दहा लाख लिटर क्षमतेचे जलकुंभाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्यापही जवळपास २५ टक्के रखडले आहे. ते होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पाईपलाइनचे काम करूनही नगरपालिकेकडे जलशुद्धीकरण क्षमता नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यातच वितरणचे काम ३० टक्के भागातच पूर्ण झाले आहे. उर्वरित भागात वितरणचे काम सुरू आहे. यातून केवळ शहरातील ३० टक्के भागातच १० दिवसांनी पाणी येते. मात्र उर्वरित ७० टक्के भागात ४० दिवसांआड पाणी येत आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावर समाधानकारक उत्तर नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदारांना देता आले नाही. नगरविकास विभागाचे सचिव यांच्या पत्रास केवळ गाेलमाल उत्तर देऊन, काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले.
जनतेला नियमित पाणीपुरवठा करावा...
अहमदपूरचे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. चाळीस दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अनेक वेळा बैठका, चर्चा आणि निवेदन देऊनही संबंधित यंत्रणा काम करीत नाही. त्यासाठी विधानसभेत दुसऱ्यांदा आपणास तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची वेळ आली आहे. नगरपरिषद, कंत्राटदार आणि जीवन प्राधिकरणाने सदर याेजनेचे काम लवकर पूर्ण करावे, जनतेला नियमित पाणीपुरवठा करावा, असे आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले.