४४ कोटींची पाणीपुरवठा योजना असतानाही अहमदपूरकरांची तहान दाेन टँकरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST2021-03-20T04:18:05+5:302021-03-20T04:18:05+5:30

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस चार वर्षे पूर्ण होऊनही ही योजना पूर्ण न झाल्याने पुन्हा अहमदपूरकरांना टँकरवर अवलंबून ...

Ahmedpur residents thirst for Daen tanker despite water supply scheme of Rs 44 crore | ४४ कोटींची पाणीपुरवठा योजना असतानाही अहमदपूरकरांची तहान दाेन टँकरवर

४४ कोटींची पाणीपुरवठा योजना असतानाही अहमदपूरकरांची तहान दाेन टँकरवर

अहमदपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस चार वर्षे पूर्ण होऊनही ही योजना पूर्ण न झाल्याने पुन्हा अहमदपूरकरांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. घागरभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेऊन दोन टँकरची व्यवस्था केली आहे. वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने नगरसेवकांनी योजनेचा वाढदिवस साजरा करून कंत्राटदार व जीवन प्राधिकरणाचा निषेध नोंदवला आहे.

अहमदपूरची पाणीपुरवठा योजना ४ वर्षांपासून प्रलंबित आहे. ऑगस्ट २०१७ मध्ये निविदा होऊन मार्च २०१८ ला कार्यारंभ आदेश देण्यात आला. हे काम देताना सर्वसाधारण सभेमध्ये वाद होऊन काही नगरसेवकांनी सदरील गुत्तेदाराला काम देऊ नये, असा ठराव घेतला होता. मात्र बहुमताने ६.९९ टक्के वाढीव दराने निविदा मंजूर करण्यात आली. २४ महिन्यात काम पूर्ण करून योजना पालिकेकडे हस्तांतरण करणे आवश्यक असताना आजही योजनेचे काम २० टक्के अपूर्ण आहे. आजपर्यंत पाणीपुरवठ्याचे शुक्लकाष्ट सुरू असून चार वर्षांपासून अहमदपूरकरांना योजनेतून कुठलाही लाभ झाला नाही.

पाणीपुरवठा ४० दिवसातून होतो. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. त्याचा दरही १५० ते २०० रुपये प्रति टॅंकर आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक कामांमध्ये अडचणी असल्याचे दिसून येत असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कुठलेही उत्तर देण्यास तयार नाही. दरम्यान, सदर योजनेला वेळ लागत असल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक बोलावून त्यात एक महिन्याची मुदत देऊन काम पूर्ण करण्यासंबंधी सांगितले. मात्र त्याला १५ दिवस झाले. परंतु, कामात कुठलीही प्रगती दिसून येत नाही.

जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाई लक्षात घेता दहा हजार लिटरचे दोन टँकर नगरपालिकेकडे हस्तांतरित केले. मात्र ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या भागात सदरील मोठे टँकर जातच नसल्यामुळे पाणीटंचाई कशी दूर होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नगरसेवकांकडून संताप...

जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याची मुदत दिली असून त्यातील १५ दिवस झाले तरी कामात समाधानकारक प्रगती झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कंत्राटदाराच्या विरोधात पालिकेतील नगरसेवकांनी योजनेचा चौथा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदविला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, अलिम घुडन सादिक चाऊस, बालाजी आगलावे आदी उपस्थित होते.

पाणीटंचाई जुन्या गावात असून त्या ठिकाणी ४० ते ५३ दिवसाला पाणी येते. मात्र टँकर मोठे असल्याने आणि गल्ली छोट्या असल्याने तिथे पाणीटंचाई कायम आहे.

पाणीपुरवठ्याच्या तपासणीचे काम चालू असून साधारणतः १५ एप्रिलपर्यंत पूर्ण काम होऊन सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विकास बडे यांनी सांगितले.

Web Title: Ahmedpur residents thirst for Daen tanker despite water supply scheme of Rs 44 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.