अहमदपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:18 IST2021-03-21T04:18:39+5:302021-03-21T04:18:39+5:30
सलीम सय्यद /अहमदपूर : प्रतिदिन पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ होत आहे. घरगुती सिलिंडरची किंमत ...

अहमदपूर
सलीम सय्यद /अहमदपूर : प्रतिदिन पेट्रोल, डिझेल व स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या किमतीत सतत वाढ होत आहे. घरगुती सिलिंडरची किंमत ७१९ रुपयांवरून ८४४ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना सिलिंडर परवडत नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात असल्याने शासनाच्या चुलमुक्त, धूरमुक्त अभियान कागदावरच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ग्रामीण भागातील गरीब मोलमजुरी करीत जीवन जगणाऱ्या लोकांनाही स्वयंपाकाचा गॅस मिळावा, तसेच चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे. यासाठी केंद्र सरकारने उज्वला योजनेंतर्गत गॅसचे वितरण केले. मात्र, गॅसचे भाव गगनाला भिडल्याने, त्याचबराेबर सबसीडीही जवळपास बंदच झाल्याने उज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत आहेत. स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्यालाच वाढत असून, यामुळे सर्वांचेच बजेट कोलमडले आहे. यात पगारदार, व्यावसायिकही चिंतेत असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यासमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना उन्हात वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागत आहे. धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागते. महिलांचे हे हाल थांबून व वनांचेही रक्षण होण्यासह पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी केंद्राच्यावतीने पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले. कोरोना संसर्गामुळे ठप्प असलेले काही उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरू झाले असले तरी अजूनही आर्थिक मंदीचे सावट कायम असल्याने रोजगाराची समस्या कायम आहे. अशात सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सतत वाढ होत असल्याने गोरगरिबांची पंचाईत झाली आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत ८४४ रुपयांच्या वर पोहोचली असून, सबसिडी मात्र केवळ ८ रुपये ४ पैसे एवढीच असल्याने गॅसचा खर्च वाढला आहे. अशात गॅस सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक पुन्हा चुलींचा आधार घेत आहे. त्यामुळे शासनाची पर्यावरणयुक्त गाव संकल्पना अडचणीत येण्याची शक्यता आहे.
वाढती महागाई चिंतेची बाब...
गत काही महिन्यांपासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जीवनाश्यक सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना गॅस सिलिंडरचे भावही वाढले आहे. दररोज वाढत जाणारी महागाई चिंतेची ठरत आहे. घरातील खर्च भागविताना नाकीनऊ येत आहे.
गॅसचे दर गगनाला भिडले असून, सर्वसामान्य नागरिकांना हे दर परवडणारे नाहीत त्यात आता अनुदानदेखील अत्यंत कमी येत आहे. त्यात आता गॅस सिलिंडरचे दरही वाढत असल्याने गॅस वापरणे शक्य नसल्याने चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे जिजाबाई चिलकरवार यांनी सांगितले.
सिलिंडरचा खर्च आवक्याबाहेर...
गेल्या महिनाभरात सिलिंडरच्या किमतीत १२५ एवढी रुपयांची वाढ झाली. सबसिडी केवळ ८ रुपये ४ पैसे दिली जात आहे. आधीच कोरोनामुळे काम मिळत नसताना सिलिंडरचा वाढता खर्च कोठून भरून काढावा, असा प्रश्न आहे. त्यामुळेच आम्ही आता चुलीवर स्वयंपाक करीत असून, सरपणासाठी भटकंती करीत असल्याचे परिसरातील महिलांचे म्हणणे आहे.
सबसिडी वाढविण्याची गरज...
उज्वला योजनेंतर्गत गॅस मिळाल्याने खूप आनंद झाला; मात्र सिलिंडरचे दर आता दररोजच वाढत चालल्याने आमच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महागडा गॅस वापरणे परवडत नसल्याने चुलीवरच स्वयंपाक करण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे शासनाने गॅसवरील सबसिडी वाढविण्याची गरज आहे, असे प्रवीण लांजे म्हणाले, तर गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक चुलीवरच स्वयंपाक करीत असल्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातून बुकिंगचे प्रमाण खूपच कमी झाले असल्याचे गॅस एजन्सीचे संचालक महेंद्र खंडागळे म्हणाले.