बाजार समितीत शेतीमालाची आवक वाढली; सोयाबीनला ७२२५ चा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:17+5:302021-05-05T04:32:17+5:30

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर आला असून, खते, बियाणे, मशागतीसाठी पैशाची गरज असते. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल बाजार ...

Agricultural commodities increased in the market committee; Rate of 7225 for soybean | बाजार समितीत शेतीमालाची आवक वाढली; सोयाबीनला ७२२५ चा दर

बाजार समितीत शेतीमालाची आवक वाढली; सोयाबीनला ७२२५ चा दर

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर आला असून, खते, बियाणे, मशागतीसाठी पैशाची गरज असते. त्यामुळे शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे बाजार समितीत गत आठवड्याच्या तुलनेत शेतीमालाची आवक वाढली असल्याचे चित्र आहे.

मंगळवारी बाजार समितीमध्ये १२९ क्विंटल गूळ, ११६९ क्विंटल गहू, हायब्रीड ज्वारी ३३, रब्बी ज्वारी ४३८, हरभरा १० हजार ५७०, तूर २७६१, मूग ११, एरंडी १०, करडई १२६, सोयाबीन ११०३, चिंच १४६२, तर चिंचोक्याची १०१२ क्विंटल आवक झाली आहे.

हरभऱ्याला ५ हजार ३०, तुरीला ६ हजार ५५०, सोयाबीनला ७ हजार २२५, तर मुगाला ६ हजार ६०० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळत आहे. मागील काही दिवसांत आवक घटली होती. मात्र सध्या सोयाबीन आणि हरभऱ्याची आवक वाढली आहे. कोरोना नियमांचे पालन करीत बाजार समितीत व्यवहार पार पाडले जात आहेत.

खरीप हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे शेताची मशागत तसेच बियाणे, खतांसाठी पैशाची गरज असते. त्यामुळे शेतीमाल विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मागील हंगामातील सोयाबीन यावर्षी विक्रीसाठी आणला आहे. जवळपास दुप्पट भाव मिळत आहे.

- अण्णा महामुनी, शेतकरी

मशागतीची कामे सुरू आहेत. मजुरांना देण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने शेतीमाल विक्रीसाठी आणला आहे. सध्या संचारबंदीमुळे शेतीमाल विक्रीला आणण्यासाठी कोणी धजावत नाही. मात्र सोयाबीनला अधिक भाव मिळत असल्याने बाजार समितीत सोयाबीन घेऊन आलो आहे.

- बालाजी लोंढे, शेतकरी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदी आहे. त्यामुळे काही दिवसांपासून आवक घटली होती. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने सोयाबीन, हरभरा, तुरीची आवक होत आहे. दरही समाधानकारक असून, पुढील काही दिवसांत शेतीमालाची आवक वाढण्याची शक्यता आहे.

- व्यापारी

कोरोनाच्या नियमांचे पालन करीत व्यवहार सुरळीत चालू आहेत. दरवर्षी खरीप हंगामाच्या आधी आवक होत असते. सध्या सोयाबीनला उच्चांकी ७ हजार २२५ रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे आवक वाढत आहे. खरीप हंगामासाठी आर्थिक मदत लागत असल्याने शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात.

- व्यापारी

Web Title: Agricultural commodities increased in the market committee; Rate of 7225 for soybean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.