पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; विवाह सोहळेही झाले लाॅकडाऊन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST2021-05-14T04:19:09+5:302021-05-14T04:19:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. यावर्षी तरी अक्षय तृतीया ...

पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला; विवाह सोहळेही झाले लाॅकडाऊन!
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. यावर्षी तरी अक्षय तृतीया मुहूर्त हुकणार नाही, असे अनेकांना वाटत होते; परंतु गतवर्षीचीच पुनरावृत्ती यावर्षी झाली असून, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे.
विवाह, धार्मिक विधी आदींना नियम पाळण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, तर नियम न पाळल्यास दंडही भरावा लागत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात ८, मे महिन्यात १६ आणि जून महिन्यात ८ विवाहाचे मुहूर्त आहेत. मे महिन्यातील मुहूर्त तर केव्हाच हातातून गेले आहेत. अक्षय तृतीया मुहूर्तावर तरी लाॅकडाऊन संपेल, असे अनेकांना वाटले होते; परंतु हा मुहूर्तही लाॅकडाऊनमुळे हुकला आहे. परिणामी, मंगल कार्यालये तसेच विवाहविषयक कामावर आपली उपजीविका भागविणाऱ्यांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. दंडात्मक कारवाई होत असल्याने बंधने आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने विवाहासाठी केवळ २५ व्यक्तींनाच मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी दोन तासांतच विवाह सोहळा उरकावा लागत आहे. जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रत्येकी ५० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडावा. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, नियमांचे पालन गरजेचे आहे.
दरवर्षी मे महिन्यात मंगल कार्यालयांसाठी बुकिंग असायच्या. मात्र गेल्या दीड वर्षांपासून अल्प प्रतिसाद आहे. सध्या संचारबंदी लागू असल्याने विवाह सोहळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. त्यातही अनेक जण घरच्या घरीच पसंती देत असल्याने मंगल कार्यालयांचे नुकसान आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक विवाह होतात. मंडप, डेकोरेशनसाठी ऑर्डर असतात. मात्र, यंदा हा मुहूर्त हातातून गेला आहे. त्यामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे. दीड वर्षापासून कोरोनामुळे व्यवसायाचे नुकसान होत आहे. यावर्षी परिस्थिती सुधारेल, असे चित्र होते.
- कृष्णात आकनगिरे,
मंडप व्यावसायिक
आनंदोत्सवाला कोरोनाचे नियम आडवे
कोरोनामुळे दररोज बाधितांचा आलेख वाढत आहे. शासनाने त्यामुळे लाॅकडाऊन लागू केले आहे. अक्षय तृतीया चांगला मुहूर्त असल्याने अनेकांनी विवाहाच्या तारखाही काढून ठेवल्या होत्या.
कोरोनाच्या आधी विवाह समारंभ मोठ्या आनंदोत्सवात साजरे होत असत. मात्र यावेळेस कोरोनाचे नियम आडवे आले असल्याने मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह उरकावे लागत आहेत.
दरम्यान, अनेकांनी मे महिन्याऐवजी जून महिन्यात मुहूर्त काढले आहेत. मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या संकटामुळे अक्षय तृतीयेचा मुहूर्त हातातून गेला असल्याचे चित्र आहे. परिणामी, वधू-वर पित्यांमधून नाराजीचा सूर आहे.