पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग हाच पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:39+5:302021-02-23T04:29:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले ...

पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही; मास्क व फिजिकल डिस्टन्सिंग हाच पर्याय
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने शहरातील व्यापारी, उद्योजकांशी संवाद साधला असता, त्यांनी पुन्हा लाॅकडाऊन परवडणारे नसल्याचे सांगत सर्वांनी नियमांचे पालन करून मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवणे हाच पर्याय असल्याचे सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १७ हजार ८०८ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २४ हजार ८६६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, २३ हजार ८२१ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ६९९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करणे परवडणारे नसून, अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले आहेत. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाशी लढा देता येईल. बाजारात जाताना मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर केल्यास कोरोनाला दूर ठेवता येईल, असेही व्यापारी म्हणाले.
काळजी घ्या, धोका वाढतोय
जिल्ह्यात रविवारी ४४, शनिवारी २६, शुक्रवारी ४८ तर गुरुवारी ३५ रुग्ण नव्याने आढळले आहेत. बरे होण्याचे प्रमाणही ९५.८७ टक्क्यांवर आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना नियमांचे पालन करीत आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एल. एस. देशमुख यांनी केले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात चाचण्या वाढविल्या आहेत.